निसर्ग, माणूस आणि आरोग्य यांचे परस्परसंबंध उलगडत शाश्वत जीवनशैलीचा विचार रुजविण्यार्या संगीता जितेंद्र खरात यांच्याविषयी...
माणसाचे निसर्गाशी असलेले नाते, त्याच्या खाण्यापिण्यात, संस्कृतीत, आणि जीवनशैलीतही रुजते. आधुनिक जगात हे नाते जिवंत करण्याची गरज अधिक तीव्रतेने जाणवते. जैवविविधतेच्या संवर्धनापासून आपल्या ताटातील अन्नाचे महत्त्व समजून घेण्यापर्यंतचा प्रवास, संगीता खरात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ करीत आहेत. पर्यावरण, ग्रामीण विकास, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि पोषणशास्त्राला, एका विचारसूत्रात गुंफण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
मुंबईतील ‘सृष्टिज्ञान’ या पर्यावरण शिक्षण, संशोधन आणि माहिती संकलन करणार्या संस्थेच्या सहसंचालिका म्हणून त्या कार्यरत आहेत. माणूस आणि निसर्गातील नाते अर्थपूर्ण करणे, हा त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू. विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकर्यांशी संवाद साधताना, पर्यावरणाचे प्रश्न जगण्याचा भाग कसे होतील, याचा त्यांनी सातत्याने विचार केला. जंगल वाचविणे, जैवविविधता जपणे किंवा हवामानबदलाला सामोरे जाण्याची सुरुवात जीवनशैलीतील छोट्या बदलांतूनही होते, हा विचार त्यांच्या कामातून अधोरेखित होतो.
मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर त्यांनी, मानव संसाधन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतले. ‘सृष्टिज्ञान’च्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण शिक्षणाला प्रत्यक्ष अनुभवांची जोड दिली. विद्यार्थ्यांत निसर्गाविषयी जिज्ञासा निर्माण करण्यासाठी, ‘निसर्गाचे राजदूत’ उपक्रम राबवला. महाविद्यालयीन तरुणाईला संवर्धनात सहभागी करून घेणार्या ‘ग्रीन यूथ’ प्रकल्पातून, मुंबईतल्या दहा महाविद्यालयांमधील ५००हून अधिक विद्यार्थ्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात स्थानिक वृक्षांच्या बिया आणि रोपांची लागवड केली. यामागची परिसंस्था समजून घेण्याची संधी या उपक्रमाने विद्यार्थ्यांना दिली.
पर्यावरण शिक्षणाचा परीघ विस्तारण्यासाठी त्यांनी समुद्रकिनारे, कांदळवने, जंगलांचे अधिवास आणि शेतीचे बांधही शिकण्याची जिवंत केंद्रे आहेत, या जाणिवेतून उपक्रम राबवले. फणसाड परिसरातील गिधाडांचा अभ्यास, शिवडीतील फ्लेमिंगोंविषयी जनजागृती आणि देवगड परिसरातील कांदळवन संवर्धनातून निसर्गातील घटकांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवले.
निसर्गाबरोबरच्या नात्याचा धागा म्हणजे अन्न. आपल्या प्रत्येक घासामागे त्या प्रदेशाची माती, हवामान, शेती आणि संस्कृती असते; ही जाणीवच त्यांना पारंपरिक अन्नधान्यांच्या संवर्धनाकडे घेऊन गेली. देवरूखमध्ये देशी भात आणि नाचणीच्या जातींचे संवर्धन, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन आणि महिला बचत गटांना प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात त्यांनी योगदान दिले. स्थानिक धान्यांपासून पौष्टिक पदार्थ तयार करणे, त्यांचे मूल्यवर्धन आणि विक्रीविषयी ६०हून अधिक महिला बचत गटांना प्रशिक्षण दिले आहे. नाचणीचे लाडू किंवा भाजणीची चकली हे पदार्थ स्थानिक शेती, महिला कौशल्य आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला जोडणारे माध्यम ठरतात.
स्थानिक धान्ये, रानभाज्या, औषधी वनस्पतींकडे पाहण्याची दृष्टी, याच जाणिवेतून विकसित झाली. आधुनिकतेमुळे मागे पडलेल्या या पदार्थांमध्ये दडलेले आरोग्याचे ज्ञान, नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यकच. ‘फ्यूचर अर्थ एशिया नेटवर्क’च्या समन्वयक म्हणून त्यांनी काम केले. भारत आणि स्वीडनमधील हवामानबदलविषयक विद्यार्थी-युवा आदान-प्रदान कार्यक्रमातही त्या सहभागी झाल्या. हवामानबदल, अन्नव्यवस्था आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीतील संबंध अभ्यासताना, अन्ननिवडीचे पर्यावरणावरील परिणाम त्यांनी मांडले.
अलीकडेच त्यांनी आहारशास्त्र आणि पोषण विषयातील डिप्लोमा पूर्ण केला. पर्यावरणपूरक आहार आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासाला शास्त्रीय जोड देण्याच्या दृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा. अन्नपदार्थांची पोषणमूल्ये, आहारातील संतुलन आणि मानवी आरोग्याशी असलेला संबंध अभ्यास ासाठी, त्यांनी पुन्हा शिक्षणाची वाट धरली. खाद्यसंस्कृतीविषयीचे त्यांचे चिंतन लेखनातूनही व्यक्त होते. ‘पाक-पोषण’ सदरातून त्यांनी भारतीय खाद्यसंस्कृतीचा इतिहास, महाराष्ट्रातील खाद्य-वैविध्य आणि पारंपरिक पदार्थांमागील सांस्कृतिक व भौगोलिक संदर्भ उलगडले. एखाद्या प्रदेशातील हवामान, शेती, उपलब्ध धान्ये आणि लोकजीवनाचा आहारावर कसा प्रभाव पडतो, याचा वेध त्या घेतात.
संगीता यांच्या कार्याकडे पाहताना जंगलातील झाड, शेतातील देशी धान्य, डोंगरमाथ्यावरची रानभाजी आणि ताटातील अन्नाचा परस्परसंबंध लक्षात येतो. निसर्ग संवर्धनात निसर्गाने दिलेल्या संसाधनांचा आदर करणारी जीवनपद्धती स्वीकारणेही आहे. त्यांच्यासाठी पर्यावरणाचा विचार मानवी आरोग्यापासून वेगळा नाही आणि खाद्यसंस्कृतीचा अभ्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेपासून अलग नाही. या सगळ्यांच्या मुळाशी निसर्गाबद्दलची आस्था आणि माणसाच्या जगण्याविषयीची संवेदनशीलता आहे. हीच आस्था त्यांच्या कामाला दिशा देते. निसर्गाशी माणसाचे तुटत चाललेले नाते पुन्हा जोडण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना आणि पुढील वाटचालीला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मनःपूर्वक शुभेच्छा!