नवी दिल्ली (Netflix Pakistani Content India Ban) : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सला भारतात पाकिस्तानी कंटेंट स्ट्रीम न करण्याबाबत कठोर निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी वेबसीरिज ‘जो बच्चे हैं संग समेट लो’ भारतात प्रदर्शित होण्याच्या शक्यतेवरून वाद निर्माण झाल्यानंतर मंत्रालयाने नेटफ्लिक्सला जून २०२५ मध्ये दिलेल्या आश्वासनाचे पालन करण्यास सांगितल्याचे वृत्त आहे.
‘जो बच्चे हैं संग समेट लो’ ही पाकिस्तानी वेबसीरिज सध्या भारतात चर्चेचा विषय ठरली आहे. चित्रपट संघटना आणि सोशल मीडियावरील अनेक वापरकर्त्यांनी या मालिकेवर भारतात बंदी घालण्याची मागणी केली आहे. वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने २०२५ मध्येच नेटफ्लिक्सला भारतात पाकिस्तानी कंटेंट उपलब्ध होणार नाही, याची खात्री करण्यास सांगितले होते. (Netflix Pakistani Content India Ban)
नेटफ्लिक्सने दिले होते आश्वासन
गेल्या वर्षी जून महिन्यात नेटफ्लिक्सने पाकिस्तानमध्ये तयार झालेला कोणताही चित्रपट किंवा वेबसीरिज भारतात स्ट्रीम केला जाणार नाही, अशी हमी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला दिली होती. आता ‘जो बच्चे हैं संग समेट लो’ या मालिकेवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने नेटफ्लिक्सला या आश्वासनाची आठवण करून देत त्याचे काटेकोरपणे पालन करण्याची सक्त ताकीद दिली आहे. (Netflix Pakistani Content India Ban)
‘ऑपरेशन सिंदूर’वरूनही वाद
या वेबसीरिजमधील कलाकारांनी ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारताने केलेल्या लष्करी कारवाईवर तसेच भारतीय सशस्त्र दलांवर टीका केल्याचा आरोप आहे. या मुद्द्यावरून सोशल मीडियावर वेबसीरिजविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे ही मालिका भारतात स्ट्रीम करण्याच्या शक्यतेला विरोध वाढला आहे. या पार्श्वभूमीवर नेटफ्लिक्सची भूमिका आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून होणारी पुढील कारवाई याकडे लक्ष लागले आहे. (Netflix Pakistani Content India Ban)