मुंबई, (Maharashtra Farmer Rickshaw Scheme): दुष्काळ, अनियमित पाऊस, शेतीमालाला मिळणारा कमी बाजारभाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘अनाथांचा नाथ... दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजने’अंतर्गत २०२७ ते २०३१ या पाच वर्षांत एक लाख प्रवासी ऑटो रिक्षांचे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या सहकार्याने परिवहन विभाग आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. राज्यातील ३१० हून अधिक दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. येत्या ९ फेब्रुवारी २०२७ रोजी पात्र लाभार्थ्यांना रिक्षांच्या चाव्या सुपूर्द करण्यात येणार आहेत. या योजनेत रिक्षाच्या एकूण किमतीच्या ९० टक्के रक्कम राष्ट्रीयीकृत किंवा अनुसूचित बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्जस्वरूपात, तर उर्वरित १० टक्के रक्कम कल्याणकारी मंडळाकडून अनुदान म्हणून दिली जाणार आहे. पहिल्या वर्षी २० हजार शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे.(Maharashtra Farmer Rickshaw Scheme)
लाभार्थ्यांची निवड अर्जांची छाननी आणि संगणकीय लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे. पात्र शेतकरी कुटुंबाच्या नावावर शेती असणे, यापूर्वी अशा योजनेचा लाभ घेतलेला नसणे आणि वाहन चालविण्याचा वैध परवाना असणे आवश्यक आहे. शेतीतील अनिश्चिततेवर मात करण्यासाठी पर्यायी उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. रिक्षा व्यवसायातून नियमित उत्पन्न मिळाल्यास दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्वावलंबन मिळण्यास मदत होईल, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.(Maharashtra Farmer Rickshaw Scheme)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.