"कामातील दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, इंदू मिलमधील डॉ. आंबेडकर स्मारक २०२७ पर्यंत पूर्ण करा"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश!

    26-Nov-2026

Indu Mill Ambedkar Memorial
 
मुंबई, (Indu Mill Ambedkar Memorial) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर इंदू मिल येथील स्मारकाचे उर्वरित काम गतीने पूर्ण करून हे स्मारक २०२७ पर्यंत पूर्ण करावे. त्यासाठी कंत्राटदाराने सुधारित कामाची कालमर्यादा निश्चित करून उच्चाधिकार समितीकडे तसा अहवाल सादर करावा. तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कामाच्या प्रगतीवर दररोज नियंत्रण ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
 
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत इंदू मिलमधील स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रकल्पाची सद्यस्थिती, स्ट्रक्चरल स्टीलचे फॅब्रिकेशन, ब्रॉन्झ क्लॅडिंग, बांधकामाची गुणवत्ता, कंत्राटदाराच्या अतिरिक्त आर्थिक मागण्या आणि काम पूर्ण करण्याच्या कालमर्यादेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.(Indu Mill Ambedkar Memorial)
 
स्मारकाचे काम अपेक्षित गतीने पूर्ण होत नसल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. कंत्राटातील अटी व शर्तींचे पालन करून काम पूर्ण करणे ही संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी आहे. आर्थिक मागण्यांमुळे काम थांबविणे योग्य नसून, कामातील दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. संबंधित एजन्सीची काम पूर्ण करण्याची क्षमता आणि बांधिलकी तपासून आवश्यकतेनुसार पर्यायी एजन्सी नियुक्त करण्यासह कठोर कारवाईच्या पर्यायांचाही विचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

आर्थिक दाव्यांची छाननी करून निर्णय
 
कंत्राटातील तरतुदी, जीएसटी दरातील बदल, दरवाढ निर्देशांक आणि अतिरिक्त कामांमुळे निर्माण झालेल्या खर्चाची तांत्रिक व आर्थिक पडताळणी करावी. जीएसटी दरातील बदलाबाबत कंत्राटातील तरतुदींनुसार कायदेशीर अभिप्राय घ्यावा. ब्रॉन्झ क्लॅडिंगसाठी आवश्यक साहित्य खरेदी करता यावे, यासाठी बँक हमीच्या आधारे आगाऊ रक्कम देण्याच्या प्रस्तावाची तपासणी करावी. सर्व आर्थिक प्रस्ताव एकत्रितपणे समितीसमोर ठेवून नियमानुसार निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.(Indu Mill Ambedkar Memorial)
 
स्मारकाच्या संरचनात्मक रचनेची गुणवत्ता, सुरक्षितता आणि स्थैर्य याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. संबंधित एजन्सीची जबाबदारी कायम ठेवून कामाची गती वाढवावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हा महत्वाचा सार्वजनिक प्रकल्प असल्याने त्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
 
जबाबदारीने काम करा – शिरसाट
 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक हा जनभावनेशी निगडित महत्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे कंत्राटदाराने कोणतेही कारण देऊन दहा महिने काम थांबविणे योग्य नाही. कंत्राटातील अटी व शर्तींचे पालन करून काम पूर्ण करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. शासनाकडून आवश्यक आर्थिक बाबींची नियमानुसार छाननी केली जाईल; मात्र त्यामुळे काम रखडता कामा नये, असे असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी बजावले.(Indu Mill Ambedkar Memorial)
 




संबंधित मजकूर