डोंबिवलीत पिण्याच्या पाण्यात पुन्हा अळ्या; पाइपलाइनमधील दोषाचा संशय

मिलापनगरमध्ये तीन दिवसांत दुसऱ्यांदा प्रकार; जोडणीच्या ठिकाणी खोदकाम करून तपासणी, नागरिकांमध्ये संताप

    26-Nov-2026

Dombivli Drinking Water Contamination
 
ठाणे, (Dombivli Drinking Water Contamination): डोंबिवली एमआयडीसी निवासी क्षेत्रातील मिलापनगरमध्ये पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळण्याचा प्रकार पुन्हा घडल्याने रहिवाशांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन दिवसांपूर्वी नळाला आलेल्या पाण्यात लालसर अळ्या आढळल्यानंतर रहिवाशांनी एमआयडीसी आणि केडीएमसीकडे तक्रार केली होती. त्यानंतर प्रशासनाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले. मात्र, गुरुवारी पुन्हा पाण्यात अळ्या आढळल्याने पाणीपुरवठा यंत्रणेतील दोषाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
 
गुरुवारी सकाळी एमआयडीसीचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी रस्त्यावरील मुख्य पाइपलाइनमधून आरएल-१३६ या बंगल्याला जाणाऱ्या अर्धा इंची जोडणीच्या ठिकाणी खोदकाम करण्यात आले. या जोडणीतून प्लास्टिकच्या बादलीत पाणी घेतले असता त्यातही अळ्या आढळल्या. त्यामुळे घरातील नळ किंवा पाण्याच्या टाकीऐवजी पाइपलाइनमध्येच दोष असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Dombivli Drinking Water Contamination)
 
या पार्श्वभूमीवर संबंधित बंगलेवजा घरांना दुसऱ्या पाइपलाइनमधून पाणी जोडणी देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच परिसरातील अन्य इमारती आणि बंगल्यांमध्येही अशा तक्रारी आल्यास त्यांची तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, पाण्याच्या नमुन्यांचा प्रयोगशाळेतील अहवाल आल्यानंतर अळ्या आढळण्यामागील नेमके कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
 
पाण्यात अळ्या आढळल्याच्या प्रकारानंतर नागरिकांनी नळाचे पाणी थेट पिणे बंद केले आहे. पाणी उकळून घेतल्यानंतरच वापरण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक घराला उकळण्याचा पर्याय स्वीकारावा लागत असल्याने पाणीपुरवठा यंत्रणेच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे. वारंवार तक्रारी होऊनही समस्या कायम असल्याने प्रशासनाने तात्पुरत्या उपायांऐवजी दोष शोधून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.(Dombivli Drinking Water Contamination)
 
पाइपलाइनची संपूर्ण तपासणी करण्याची मागणी
 
“मिलापनगरमध्ये पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळण्याचा प्रकार तीन दिवसांपूर्वी समोर आणला होता. त्यानंतर एमआयडीसी आणि केडीएमसीने पाहणी केली, पाण्याचे नमुने घेतले; मात्र आज पुन्हा त्याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली. प्रत्यक्ष पाइपलाइनच्या जोडणीवर खोदकाम करून तपासणी केली असता तिथेही अळ्या आढळल्या आहेत. याचा अर्थ समस्येचे मूळ शोधून कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नाही. नागरिकांनी कर भरूनही त्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नसेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने केवळ नमुने घेण्याचे सोपस्कार न करता संपूर्ण पाइपलाइनची तपासणी करून दोष दूर करावा. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सहन केला जाणार नाही,” अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली.(Dombivli Drinking Water Contamination)
 




संबंधित मजकूर