उत्तर प्रदेशात भाजपला पराभूत करण्याचा एकमेव उद्देश शिल्लक असलेल्या काँग्रेस आणि समाजवादी पक्षात, जागावाटपावरून जुंपली आहे. काँग्रेसला १२५ जागा हव्या आहेत, तर समाजवादी पक्षाची २६ जागांपलीकडे एकही जागा देण्याची तयारी नाही. काँग्रेसच्या मते आघाडीत तिचा वाटा मोठा, तर समाजवादी पक्षाच्या मते काँग्रेसची राजकीय किंमत अवघ्या २६ जागांची! असा अपमान झाल्यावर काँग्रेसच्या इमान मसूद यांनी संतापात ‘आम्ही काय भिकारी आहोत का?’ असा सवाल करणे स्वाभाविकच. मात्र, काँग्रेसला १२५ जागा देण्याइतका जनाधार तरी आहे का? हा प्रश्न त्याहून अधिक महत्त्वाचा आहे. उत्तर प्रदेशमध्ये सध्याची स्थिती अशी की, दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे; पण ते मान्य करण्याची तयारी कोणाचीच नाही. अखिलेश यादव यांनी आज या परिस्थितीवर पाजळलेले ‘बात सीट की नहीं, जीत की है’ हे तत्त्वज्ञान, तर जागावाटप नाट्यातील सर्वाधिक सोयीचे विधान आहे. जागा मागणार्यांना विजयाचे महत्त्व सांगायचे आणि प्रत्यक्षात मात्र स्वतःचाच फायदा प्रथम पाहायचा! त्यात पुन्हा समाजवादी पक्षाची ‘उमेदवार सांगा, जागा देतो’ अशी अटही घातली आहे. अर्थात, समाजवादीचे सरकार येईल, याची खात्री अखिलेश यांनाही नाही. काँग्रेसची मागणीही तितकीच विनोदी. त्यांना १२५ जागा हव्या आहेत; पण त्या जागांवर विजय मिळवून देण्याची खात्री असलेल्या उमेदवारांचे काय?
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत आघाडीचा फार्स रंगला आहे. समाजवादी पक्षाने २६ जागा दिल्यास, काँग्रेसचे अस्तित्वच धोयात येईल आणि १२५ जागा मिळाल्या नाहीत, तर आघाडीतील प्रतिष्ठा जाईल. म्हणजे, काँग्रेस दोन्ही बाजूने अडकली आहे. अखिलेश यांचा ‘पीडीए’चा नाराही राजकीय सोयीचाच भाग. एकूणच, अखिलेश यांना काँग्रेसची साथ हवी; पण तिची ताकद वाढलेली नको. काँग्रेसला आघाडी हवी; पण अखिलेश यांच्या मर्जीनुसार राजकीय अस्तित्व चालवायचे नाही. दोघांनाही भाजपचा पराभव हवा आहे. मात्र, त्याआधी मित्रपक्षाला किती खाली ठेवता येईल, याची चढाओढ सुरू आहे. भाजपविरोधी मतांची बेरीज करण्यापूर्वी स्वतःच्या महत्त्वाकांक्षांची वजाबाकी करण्याची तयारी या दोघांपैकी कोणाची आहे, हाच खरा प्रश्न!
तेजोमय नोव्हेंबर
शेअर बाजारात पैसा कधी येतो आणि कधी जातो, याला वरकरणी अनेक कारणे असतात. व्याजदर, महागाई, युद्धजन्य परिस्थिती, कच्च्या तेलाचे भाव किंवा एखाद्या मोठ्या अर्थव्यवस्थेतील राजकीय उलथापालथ. परंतु, या सगळ्यांच्या पलीकडे एक गोष्ट असते; ती म्हणजे गुंतवणूकदारांचा विश्वास! नोव्हेंबर महिन्यात दिवाळीनिमित्ताने संपूर्ण भारत तेजोमय झाला असतानाच, भारतीय शेअर बाजारही उजळला. ही तेजी जागतिक गुंतवणूकदारांच्या विश्वासाचेच निदर्शक. ‘सेन्सेस’ने एकाच महिन्यात दुसर्यांदा दोन हजार अंशांची झेप घेतली. महिन्याच्या सुरुवातीपासून निर्देशांकाने १०.७१ टक्क्यांची वाढ नोंदवली. ‘बीएसई’वरील कंपन्यांच्या बाजारमूल्यात जवळपास ३५ लाख कोटी रुपयांची भर पडली आणि बाजारमूल्य ५०९ लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचले. परंतु, यातील लक्षणीय बाब म्हणजे, परकीय गुंतवणूकदारांची १.२७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक. कालपर्यंत भारतीय बाजारातून पैसा काढून घेणारे परकीय गुंतवणूकदार, आज मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असतील; तर या बदलाचा अर्थ समजून घ्यावा लागेल. जागतिक पटावर भारताचे स्थान बदलत आहे. चिनी अर्थव्यवस्थेतील मरगळ, अमेरिकेतील कंपन्यांच्या अवास्तव मूल्यांकनाविषयीची चिंता आणि पश्चिम आशियातील अस्थिरतेमुळे जागतिक भांडवलदार नव्या संधी शोधत आहेत. अशा वेळी भारताची मोठी देशांतर्गत बाजारपेठ, स्थिर अर्थव्यवस्था आणि वाढती उपभोग क्षमता याबाबी गुंतवणूकदारांना आकर्षित करतात.
जागतिक भांडवलाची बदलती दिशा भविष्यातील संधींचे संकेत देत असते. नोव्हेंबरमधील उसळीने भारताच्या आर्थिक प्रवासाला नवे बळ दिले आहे. आता या विश्वासाचे रूपांतर उत्पादनवाढीत, रोजगारनिर्मितीत आणि व्यापक आर्थिक समृद्धीत करण्याची संधी भारतासमोर आहे. जागतिक गुंतवणुकीच्या पटावर भारताचे स्थान अधिक भक्कम होत असेल; तर ही केवळ बाजाराचीच तेजी नसून, देशाच्या आर्थिक भविष्याविषयी आश्वस्त करणारीही घडामोड आहे. नोव्हेंबरच्या घटनेने जागतिक भांडवल भारताकडे पुन्हा वळल्याचे अधोरेखित केले. आता जागतिक गुंतवणुकीची दिशा बदलताना भारताने दीर्घकालीन आर्थिक संधी म्हणून स्वतःचे स्थान भक्कम करणे आवश्यक आहे.
लेखक- कौस्तुभ वीरकर