नवी दिल्ली (Amit Shah Constitution Day Speech 2026) : संविधान गौरव दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमाला संबोधित करत संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. “संविधानाचा सन्मान करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपल्या देशाच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली,” असे शाह म्हणाले. १८५७ ते १९४७ या ९० वर्षांच्या स्वातंत्र्यलढ्यात असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी भारतमातेच्या चरणी हसत हसत आपल्या प्राणांची आहुती दिली, असेही त्यांनी नमूद केले.
‘संविधान हातात घेऊन फिरणाऱ्यांनी त्याची मूळ प्रत वाचावी’
“आपल्या सभ्यतेला विरोध करणाऱ्यांना मला सांगायचे आहे की, तुमच्या आयुष्यात संविधानासाठी १० ते १५ मिनिटे वेळ असेल, तर एकदा संविधानाची मूळ प्रत नक्की पाहा,” असे आवाहन अमित शाह यांनी केले.(Amit Shah Constitution Day Speech 2026)
संविधानाच्या मूळ प्रतीतील विविध प्रकरणांच्या सुरुवातीला भारतीय इतिहास आणि संस्कृतीशी संबंधित चित्रे आहेत. यामध्ये भगवान श्रीरामांचे अयोध्येत आगमन, भगवान बुद्ध, भगवान महावीर, दशम गुरु गोविंद सिंह, राणी लक्ष्मीबाई, दांडी यात्रा आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची चित्रे समाविष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
संविधान हातात घेऊन फिरणाऱ्यांनी संसद ग्रंथालयात जाऊन संविधानासाठी १५ मिनिटे द्यावीत आणि नंदलाल बोस यांनी रेखाटलेल्या चित्रांच्या माध्यमातून संविधानाची मूळ भावना समजून घ्यावी, असेही शाह म्हणाले. (Amit Shah Constitution Day Speech 2026)
‘संविधानातूनच सत्ता मिळेल आणि संविधानातूनच सत्ता जाईल’
देशाचे संविधान नागरिकांना लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार देते. “संविधानातूनच सत्ता मिळेल आणि संविधानातूनच सत्ता जाईल. देशात अनेकदा सत्ताबदल झाले; मात्र कधीही हिंसाचार झाला नाही. हे संविधानामुळेच शक्य झाले,” असे अमित शाह यांनी म्हटले. (Amit Shah Constitution Day Speech 2026)
संविधानाचा सन्मान करणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची आणि महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यानंतर संविधानाकडे केवळ सरकार चालवण्यासाठीची मार्गदर्शक पुस्तिका म्हणून पाहिले गेले. मात्र, त्यातील मूल्ये आणि भावना किशोरवयीन मुले, तरुण आणि नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
२०१५ पासून ‘संविधान गौरव दिन’ साजरा करण्यास सुरुवात
२०१४ मध्ये नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर २०१५ मध्ये दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अमित शाह यांनी सांगितले. संविधानातील सर्वोच्च मूल्ये शाळा, महाविद्यालये आणि देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावीत, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Amit Shah Constitution Day Speech 2026)