नक्षलमुक्त गडचिरोलीचा नवा अध्याय! आता जिल्ह्याची ओळख ‘स्टील हब’ म्हणून; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा!

नक्षलमुक्तीचे श्रेय पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    25-Nov-2026
 
Naxal Free Gadchiroli
 
मुंबई (Naxal Free Gadchiroli) : भारत आता अधिकृतपणे नक्षलमुक्त झाला आहे. देशातील एकही जिल्हा नक्षलग्रस्त राहिलेला नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टद्वारे केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली डाव्या विचारसरणीचा सशस्त्र उग्रवाद पूर्णपणे संपुष्टात आणण्यात यश आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
'बंदुकीपासून सुशासनाकडे, भीतीपासून स्वातंत्र्याकडे आणि उग्रवादापासून सक्षमीकरणाकडे' असा भारताचा प्रवास झाल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. हे यश केवळ मोदी सरकारच साध्य करू शकले, असेही त्यांनी म्हटले आहे. (Naxal Free Gadchiroli)
गडचिरोली जिल्हाही नक्षलमुक्त झाला असून, आता तो देशातील पुढील मोठे स्टील हब बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. शांतता, विकास आणि विश्वासाचे प्रतीक म्हणून गडचिरोलीची नवी ओळख निर्माण होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. (Naxal Free Gadchiroli)
 
या यशाचे श्रेय त्यांनी शूर सुरक्षा दलांचे जवान, पोलीस यंत्रणा आणि शांतता व विकासाचा मार्ग निवडणाऱ्या गडचिरोलीतील नागरिकांना दिले. देशात पुन्हा कधीही विभाजनकारी आणि हिंसक विचारसरणीला थारा मिळू नये, असा संकल्प नागरिकांनी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
 
दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, मार्च-एप्रिल २०२६ मध्ये देशातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या शून्यावर आली. यापूर्वी २०१४ मध्ये देशातील १२६ जिल्हे नक्षलग्रस्त होते. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. नरेश यांनीही मे २०२६ मध्ये जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचे जाहीर केले होते. (Naxal Free Gadchiroli)





संबंधित मजकूर