मुंबई : ‘मुंबई पुस्तक महोत्सवा’ला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तब्बल ७५ हजारांहून युवा आणि नागरिकांनी नोंदणी करून महोत्सवाला भेट दिली. मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून पुस्तक महोत्सवातील स्टॉल सुरू करण्यात आले. सायंकाळी ६ वाजता महोत्सवाचे अधिकृत उद्घाटन होण्यापूर्वीच ७५ हजार नागरिकांनी नोंदणी केली. ‘मुंबई पुस्तक महोत्सवा’चे मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी यांनी सांगितले की, "मुंबईची ओळख आतापर्यंत कला, संस्कृती आणि चित्रपटांमुळे होती. आता त्यामध्ये पुस्तक महोत्सवाचीही भर पडत आहे. जीवनात पुस्तकांशिवाय प्रकाश नाही. त्यामुळे मुंबईत या पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून एका महत्त्वपूर्ण उपक्रमाचा पाया रचला जात आहे. मुंबईकरांनी पहिल्याच दिवशी दिलेला प्रतिसाद हा त्याचा पुरावा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई पुस्तक महोत्सव निश्चितच जागतिक दर्जाचा ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सगळे विक्रम मोडणार -मुख्यमंत्री
मुंबई पुस्तक महोत्सव’ सगळे विक्रम मोडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला. मराठी माणसाने नेहमीच पुस्तकांना डोक्यावर घेतले असून, हा महोत्सव केवळ पुस्तकांचा नव्हे, तर संवेदना, भविष्य आणि मानवतेचा उत्सव आहे. पुस्तकांसोबतच येथे विचारांचाही महायज्ञ होणार आहे. प्रत्येकाने या ज्ञानयज्ञातून ज्ञान संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
‘नॅशनल बुक ट्रस्ट’, महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, महापौर रितू तावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मुख्य संरक्षक मिलिंद मराठे, मुख्य आयोजक आ. अमीत साटम, मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, "मुंबई ही आर्थिक राजधानी असण्याबरोबरच साहित्य, कला आणि विचारांचेही महत्त्वाचे केंद्र आहे. मराठी भाषा आणि साहित्य हा मुंबईचा आत्मा असला, तरी विविध भाषांमधील साहित्य आणि परंपराही या शहराने जपल्या आहेत. मुंबईच्या सांस्कृतिक वैभवात पुस्तक महोत्सवाची उणीव होती. ती आता भरून निघाली आहे. ‘नॅशनल बुक ट्रस्ट’कडून दरवर्षी मुंबईत पुस्तक महोत्सव आयोजित करण्याचे आश्वासन मिळाले,” असेही त्यांनी सांगितले.
"आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये मुंबईत ‘दर्पण’ सुरू करून ज्ञानाचे दालन खुले केले. १८९८ मध्ये मुंबई मराठी ग्रंथालयाची स्थापना झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’ आणि ‘जनता’ या नियतकालिकांतून वंचितांचा आवाज बुलंद केला,” असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य रशियापर्यंत पोहोचल्याचे सांगत त्यांनी पुस्तकांच्या सामर्थ्यावर भाष्य केले.
वाचनसंस्कृतीच्या भवितव्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, "उद्घाटनापूर्वीच ७० हजार नागरिकांनी नोंदणी करणे, हे वाचनसंस्कृती जिवंत असल्याचे द्योतक आहे. तरुण पिढी ही संस्कृती पुढे नेईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात तंत्रज्ञानाला भावना, करुणा आणि संवेदना समजत नाहीत. या मानवी मूल्यांची जपणूक पुस्तकांमधून होते. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच संवेदनशील समाज घडविण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी अधोरेखित केले.
‘एआय’ युगात पुस्तकांचे महत्त्व अधिक!
"कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माहिती सहज उपलब्ध होत असली, तरी तंत्रज्ञानाला मानवी भावना, करुणा आणि संवेदना समजत नाहीत. पुस्तकांमधून या मानवी मूल्यांचा विकास होतो. ‘एआय’चा वापर करताना मूल्यांचे भान आवश्यक आहे. पुस्तकांमुळे माणूस संवेदनशील बनतो आणि समाज अधिक प्रगल्भ होतो,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यासपीठ
मुंबईत प्रथमच एवढ्या मोठ्या स्तरावर पुस्तक महोत्सव होत आहे. उद्घाटनापूर्वीच ७० हजार नागरिकांनी भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून युवकांसाठी हे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. आपल्या ज्ञानपरंपरेचा ठेवा तरुणांपर्यंत पोहोचवून त्यांना विकसित भारताच्या निर्मितीत योगदान देण्यासाठी प्रेरित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.- आ. अमीत साटम (मुख्य आयोजक)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....