परिवर्तनशील हिंदू समाज:परंपरा, प्रवाह आणि कायद्याचा प्रवास!

    25-Nov-2026
 
Hindu Law Reforms
 
‘समान नागरी कायदा’ या महत्त्वपूर्ण विषयाचा सर्वांगीण वेध घेणारी विशेष लेखमाला... इतिहासापासून वर्तमानापर्यंत आणि घटनात्मक भूमिकेपासून महाराष्ट्राच्या भवितव्यापर्यंत विविध पैलूंचा अभ्यासपूर्ण ऊहापोह या लेखमालेतून करण्यात येत आहे.
 
काळ पुढे सरकतो, तसे समाजाच्या सुखदुःखांचे संदर्भ आणि न्यायाच्या अपेक्षाही बदलत जातात. परंपरेची मुळे कितीही खोलवर रुजलेली असली, तरी तिच्या सावलीत जगणार्‍या माणसांच्या गरजा कायम एकसारख्या राहत नाहीत. हिंदू न्यायपरंपरेचा प्रदीर्घ प्रवास याचीच साक्ष देतो. स्त्रीधन, दत्तकविधान, वारसा, कौटुंबिक कर्तव्ये यांविषयीचे प्राचीन चिंतन आणि मिताक्षर-दायभागांसारख्या भिन्न विधिशाखा पाहिल्या, तर या व्यवस्थेची प्रगल्भता लक्षात येते; त्याचबरोबर तिचा अर्थ काळ, प्रदेश आणि सामाजिक व्यवहारानुसार विकसित होत गेल्याचेही दिसते. सनातनतेचे सामर्थ्य हे मूल्ये जपतानाच आवश्यक परिवर्तनाला सामोरे जाण्यात आहे. इथे परंपरेविषयी आदरही आहे आणि तिच्या व्यवहारांचे पुनर्परीक्षण करण्याची तयारीही. अर्थात, या प्रवासाला आक्रमणे, सत्तांतरे, सामाजिक अस्थिरता आणि ब्रिटिशकालीन न्यायव्यवस्थेच्या चौकटींचे वळण लाभले. काही प्रथा कठोर झाल्या, तर काही कालबाह्य. म्हणूनच, बदलत्या काळासोबतच कायद्यातील बदलदेखील अनिवार्य होऊ लागले आणि बदलांच्या आशयाबरोबरच त्यांच्या मार्गावरही खल झाला. आगरकरांनी विवेकाधिष्ठित सुधारणांचा आग्रह धरला, तर लोकमान्य टिळकांनी विशेषतः परकीय सत्तेच्या कायदेशीर हस्तक्षेपाबद्दल कठोर भूमिका घेतली. समाजाच्या स्वयंप्रेरणेला संधी द्यावी की अन्याय दूर करण्यासाठी कायद्याने पुढाकार घ्यावा, हा प्रश्न तेव्हाही होता आणि आजही आहे. कारण समाजाचे मन बदलायला वेळ लागत असला, तरी कायद्याने संरक्षण देण्यास अनंत काळ थांबता येत नाही.
 
विधवा पुनर्विवाहाला १८५६ मध्ये मिळालेली कायदेशीर मान्यता आणि १९३७ मध्ये विधवांच्या मालमत्ताविषयक अधिकारांत झालेला विस्तार ही कायदेबादलांची प्रारंभीची उदाहरणे. पुढे हिंदू कोड बिलाने विखुरलेल्या नियमांना व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांचे अधिकार आणि कौटुंबिक न्यायासाठी या विधेयकाचा पुरस्कार केला; त्यास विरोधदेखील झाला आणि विलंबही. तथापि, सुधारणा थांबल्या नाहीत. १९५५-५६ मध्ये चार स्वतंत्र अधिनियमांनी त्या नव्या कायदेशीर चौकटीत साकारल्या आणि कालांतराने त्या समाजाने स्वीकारल्या.
 
‘हिंदू विवाह अधिनियमा’ने धार्मिक विवाहविधींची मान्यता राखून एकपत्नित्वाला बंधनकारक स्वरूप दिले. प्रभू श्रीरामांच्या एकपत्नीव्रताचा आदर्श समाजमानसांत पूर्वीपासून होता; आता वैवाहिक अधिकार आणि जबाबदार्‍यांना कायद्याचे निश्चित अधिष्ठान मिळाले. त्याचबरोबर न्यायालयीन विभक्तता, निश्चित कारणांवर घटस्फोट आणि आर्थिक साहाय्याच्या तरतुदींमुळे संसारातील अडचणींकडे केवळ सामाजिक दबावातून पाहण्याऐवजी कायदेशीर उपाय उपलब्ध झाले. पुढे १९७६ मध्ये परस्परसंमतीने घटस्फोटाची तरतूद आली, तेव्हा बदलत्या नातेसंबंधांत व्यक्तीच्या निर्णयालाही स्थान देण्यात आले.
 
मालमत्तेच्या बाबतीत तर मूलभूत परिवर्तन झाले, ‘हिंदू उत्तराधिकार अधिनियम, १९५६’ने स्त्रीच्या अधिकारातील मालमत्तेवरील मर्यादित हक्कांना, कायद्यातील अपवादांच्या अधीन राहून, पूर्ण मालकीचे स्वरूप दिले. मुलगी, विधवा आणि आई यांच्या वारसाहक्कांना वैधानिक अधिष्ठान मिळाले. महाराष्ट्राने १९९४ मध्ये काही अटींवर मुलींना सहदायिकी हक्क दिले आणि २००५च्या केंद्रीय सुधारणेने मुलींना संयुक्त कुटुंबाच्या सहदायिकी संपत्तीत मुलांप्रमाणे जन्मसिद्ध हक्क मान्य केला. स्त्रीचे स्थान केवळ कुटुंबाच्या आश्रयावर अवलंबून न ठेवता, तिला स्वतंत्र मालकीचा अधिकार देण्याच्या दिशेने ही पावले होती.
 
दत्तक व निर्वाहाच्या कायद्याने मुलगी दत्तक घेण्याचीही स्पष्ट व्यवस्था केली, विशिष्ट परिस्थितीत स्त्रीच्या दत्तक घेण्याच्या अधिकाराला मान्यता दिली आणि पत्नी, अपत्ये व वृद्ध पालक यांच्या निर्वाहाची जबाबदारी निश्चित केली. पालकत्वाच्या कायद्यात बालकाचे कल्याण हा सर्वश्रेष्ठ निकष ठरला. पालकत्व म्हणजे केवळ मुलावरील अधिकार नव्हे, तर त्याच्या हिताची जबाबदारी, हा विचार पुढे आला; १९९९ मधील गीता हरिहरन निर्णयाने आईच्या पालकत्वाच्या अधिकाराचा अर्थही अधिक व्यापक केला. म्हणजेच, बदल केवळ विवाहपुरते मर्यादित नव्हते; त्यांनी कुटुंबातील हक्कांबरोबर जबाबदार्‍यांचेही नवे समीकरण घडवले.
 
या सुधारणांना आरंभी काही घटकांनी विरोध केला, समाजाच्या व्यवहारात त्यांचा स्वीकारही एकाचवेळी झाला नाही; परंतु काळाच्या ओघात त्या हिंदू कौटुंबिक जीवनाच्या कायदेशीर व्यवस्थेत रुजल्या. सामाजिक स्वीकृतीचा हा प्रवास निर्विघ्न नव्हता किंवा एका दिवसात पूर्ण झालेला नव्हता. त्यातील प्रत्येक बदल निर्दोष होता, असा आग्रह धरण्याचे कारण नाही. तरी विरोध ऐकणे आणि विरोधामूळे सुधारणा कायमच रोखणे यात फरक आहे. हिंदू कायद्यांचा इतिहास परंपरा आणि परिवर्तन यांचा समन्वय साधण्याची क्षमता दाखवतो; ‘समान नागरी संहिते’च्या चर्चेतही समाजातील शंका ऐकून घेताना समान न्यायाचे घटनात्मक उद्दिष्ट दृष्टिआड होता कामा नये!
 
-अ‍ॅड. आशिष सोनवणे
८३०८८२५६२५
 




संबंधित मजकूर