नागपूर (Dragon Palace Temple Nagpur) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या २७व्या वर्धापन दिनानिमित्त नागपूर येथे आयोजित 'ड्रॅगन पॅलेस फेस्टिव्हल' संपन्न झाला. ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे भविष्यात तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांचा जगभर परिचय करून देणारे महत्त्वाचे जागतिक केंद्र ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तथागत गौतम बुद्ध आणि महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, तथागत गौतम बुद्धांचा धम्म हा जगातील एकमेव असा विचार आहे, ज्याने तलवारीच्या बळावर नव्हे, तर प्रज्ञा, करुणा आणि शील या त्रिसूत्रीच्या माध्यमातून संपूर्ण जगाला प्रभावित केले. भारताच्या भूमीतून उदयास आलेल्या या धम्मविचारामुळे भारत आणि जपान यांच्यात गेल्या २,५०० वर्षांपासून सांस्कृतिक आणि वैचारिक मैत्रीचे नाते निर्माण झाले आहे. (Dragon Palace Temple Nagpur)
इंटरनॅशनल निचिरेन-शू फेलोशिप असोसिएशन, जपानचे अध्यक्ष भंते कान्सेन मोचिदा वयाच्या ९०व्या वर्षीही धम्मप्रसाराचे कार्य करत आहेत. जगभरातील सुमारे ५ हजार बौद्ध विहारांचे प्रमुख म्हणून ते कार्यरत असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी त्यांनी जपानी भाषेतून भंते मोचिदा यांचे स्वागत करून आभारही मानले.
ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख ॲड. सुलेखा कुंभारे आणि मॅडम ओगावा यांनी २७ वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचे आज तथागत बुद्धांच्या विचारांचे जागतिक केंद्र म्हणून रूपांतर होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जपान, थायलंड, श्रीलंका, म्यानमार, व्हिएतनाम यांसह सात बौद्ध राष्ट्रांची वास्तुकला आणि सांस्कृतिक वारसा एकाच छताखाली अनुभवता यावा, यासाठी ‘सेव्हन वंडर्स ऑफ बुद्धिस्ट वर्ल्ड अंडर वन अम्ब्रेला’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकार आवश्यक निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. (Dragon Palace Temple Nagpur)
पवित्र दीक्षाभूमीप्रमाणेच ड्रॅगन पॅलेस टेम्पलनेही नागपूरला जागतिक नकाशावर स्थान मिळवून दिले आहे. त्यामुळे येथील मेट्रो स्थानकाला ‘ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशन’ असे नाव देण्यात आले आहे. या मेट्रो सुविधेमुळे भाविकांना दीक्षाभूमीवर दर्शन घेतल्यानंतर ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट देणे अधिक सोयीचे झाले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. (Dragon Palace Temple Nagpur)
जपानमधील १२०० वर्षांचा इतिहास असलेल्या कोयासान विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. याच विद्यापीठाकडून मानद ‘डी.लिट.’ (D.Litt.) पदवी मिळाल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, ही पदवी माझ्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांचा आशीर्वाद आहे. (Dragon Palace Temple Nagpur)
आगामी काळात भारत आणि जपानमधील विद्यापीठे एकत्र येऊन बौद्ध साहित्याचे भाषांतर, प्राचीन वारशाचे दस्तऐवजीकरण आणि सामाजिक समरसतेचा विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला आमदार डॉ. राजीव पोतदार, टोकियो येथील मिनोबुसान कुओनजी टेम्पलचे प्रमुख भंते ताईकेन ओयामा, इंटरनॅशनल त्रिपिटिका चॅन्टिंग सेरेमनी, महाबोधी विहार, बुद्धगया यांच्या मुख्य संरक्षक मॅडम वांग्मो डिक्सी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. (Dragon Palace Temple Nagpur)