पुणे (Sharan Kumar Limbale): पुण्यात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार आणि समीक्षक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवारी (२४ नोव्हेंबर) पुण्यात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ लेखक आणि प्रकाशक बाबा भांड यांचे नावही चर्चेत होते. मात्र, अखेर लिंबाळे यांच्या नावाला पसंती देण्यात आली. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला.
डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचा जन्म १ जून १९५६ रोजी सोलापूर जिल्ह्यातील हन्नूर येथे झाला. दलित साहित्याच्या क्षेत्रातील महत्त्वाचे लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. १९८४ मध्ये प्रकाशित झालेल्या 'अक्करमाशी' या आत्मकथनामुळे ते साहित्यविश्वात विशेष प्रसिद्ध झाले. जातिव्यवस्था, सामाजिक विषमता, वंचितांचे जगणे आणि संघर्ष यांचे वास्तववादी चित्रण त्यांच्या लेखनात आढळते. (Sharan Kumar Limbale)
कथा, कविता, कादंबरी आणि समीक्षा अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले आहे. 'दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र' हा त्यांचा समीक्षाग्रंथ विशेष गाजला. 'सनातन', 'हिंदू', 'बहुजन' आणि 'रामराज्य' या त्यांच्या महत्त्वाच्या कादंबऱ्या आहेत. 'सनातन' या कादंबरीसाठी त्यांना २०२० मध्ये प्रतिष्ठेचा सरस्वती सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळवणारे ते पहिले दलित साहित्यिक ठरले. (Sharan Kumar Limbale)
दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शंभरावे साहित्य संमेलन भव्यतेऐवजी साधेपणाने आणि लोकसहभागातून आयोजित करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे ऐतिहासिक शतकमहोत्सवी संमेलनाच्या आयोजनाकडे साहित्यविश्वाचे लक्ष लागले आहे. (Sharan Kumar Limbale)