पनवेलचा पाणीप्रश्न ऐरणीवर; प्रशांत ठाकूर यांची आक्रमक भूमिका

    24-Nov-2026
 
Panvel Water Crisis
 
मुंबई ,(Panvel Water Crisis) : वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने विस्तारत असलेल्या नागरी वसाहतींच्या पार्श्वभूमीवर पनवेलमधील पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंत्रालयातील उच्चस्तरीय बैठकीत पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर प्रशासनाला जाब विचारत न्हावाशेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजना मार्च २०२७ पूर्वी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची आग्रही मागणी केली. योजनेतील अडथळे दूर करून आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिले.
 
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा आणि उलवे या भागांमध्ये लोकसंख्येचा विस्तार वेगाने होत आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही वाढत असून उपलब्ध जलस्रोतांवर ताण निर्माण होत आहे. केवळ तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी भविष्यातील गरज लक्षात घेऊन कायमस्वरूपी नियोजन करण्याची भूमिका प्रशांत ठाकूर यांनी बैठकीत मांडली.(Panvel Water Crisis)
 
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या न्हावाशेवा टप्पा-३ योजनेतील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, कामांमधील अडथळे दूर करावेत आणि निर्धारित मुदतीत योजना कार्यान्वित करावी, अशी मागणी त्यांनी केली. संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून मार्च २०२७ ची मुदत पाळावी, यावर त्यांनी भर दिला.
 
न्हावाशेवा टप्पा-३ योजनेचा समावेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष वॉर रूममध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेच्या प्रगतीवर मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरून देखरेख ठेवली जात आहे. यापूर्वी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबतही या योजनेसंदर्भात दोन बैठका झाल्या असून मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत कामाला गती देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.(Panvel Water Crisis)
 
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पाणीटंचाईचा आढावा
 
पनवेलमधील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार पालकमंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाण्याचे योग्य नियोजन होईपर्यंत नवीन बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) देणे थांबवावे, अशी मागणी केली. तसेच नव्या बांधकामांमध्ये पावसाचे पाणी साठवण्याची (रेन वॉटर हार्वेस्टिंग) व्यवस्था आहे का, याची तपासणी करण्याची सूचनाही केली. मात्र, रेरा कायद्यातील तरतुदींमुळे सरसकट ओसी रोखता येणार नसल्याचे महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी स्पष्ट केले.(Panvel Water Crisis)
 




संबंधित मजकूर