मुंबई (NTA Exams in Maharashtra): राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि प्रवेश परीक्षांच्या आयोजनातील अडचणी दूर करून विद्यार्थ्यांना सुरक्षित, पारदर्शक आणि सुलभ परीक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आता राज्य शासनाचा सहभाग वाढविण्यात येणार आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) आयोजित परीक्षांसाठी राज्यातील पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि प्रशासकीय यंत्रणेचा अधिक प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उच्चस्तरीय कृतीदलाने चर्चा केली.
वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत उच्चस्तरीय कृतीदलाचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी परीक्षा आयोजनातील विविध आव्हाने आणि त्यावर उपाययोजनांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी कृतीदलाचे सदस्य डॉ. एस. सोमनाथ, शंकर मरुवाडा आणि राष्ट्रीय भरती संस्थेच्या (एनआरए) संचालक श्रुती सिंघल उपस्थित होते. (NTA Exams in Maharashtra)
मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा देत असल्याने परीक्षा केंद्रांची उपलब्धता, केंद्रांवरील सुविधा, प्रशिक्षित कर्मचारी आणि लॉजिस्टिक व्यवस्थापन हे महत्त्वाचे मुद्दे ठरत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात पुरेशा परीक्षा केंद्रांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासह राज्यातील सरकारी यंत्रणा आणि पायाभूत सुविधांचा परीक्षा आयोजनासाठी उपयोग करण्याबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. (NTA Exams in Maharashtra)
परीक्षेसाठी दूरच्या शहरांमध्ये जावे लागणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्रास कमी करणे, ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देणे तसेच इंग्रजी भाषेची अडचण असलेल्या आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी परीक्षा प्रक्रिया अधिक सुलभ करण्यावर विशेष भर देण्यात आला. परीक्षा केंद्रांवर सुरक्षित वातावरण निर्माण करून गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पारदर्शक यंत्रणा उभारण्याची गरजही व्यक्त करण्यात आली. (NTA Exams in Maharashtra)
परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक परीक्षा संधी उपलब्ध करून देणे, अभ्यासक्रमानुसार परीक्षा पद्धती निश्चित करणे आणि स्पर्धा व प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली.
राष्ट्रीय परीक्षा आयोजनात केंद्र आणि राज्य शासनामध्ये समन्वय वाढल्यास परीक्षा व्यवस्थेतील अनेक अडचणी दूर होऊ शकतात. विद्यार्थ्यांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि विद्यार्थी-केंद्रित परीक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाचा सहभाग वाढविण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. (NTA Exams in Maharashtra)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.