अहिराणी पट्ट्यात खास खापरावर सुगरणींच्या हातावर आकार घेणार्या खरपूस मांड्यांनी, नाशिकच्या खाद्यसंस्कृतीला पहिल्यापासूनच प्रगल्भ करण्याचे काम केले. मग हा मांडा दुधात खा किंवा आमरसात; अगदी तोंडात टाकताक्षणीच त्याचे पाणी नाही झाले, तरच नवल! त्यात मराठी वर्षाचा पहिलाच दिवस आणि सणही असलेल्या गुढीपाडव्यापासून आमरस, मांडे आणि त्याच्या जोडीला काळी आमटी असा बेत, नाशिकच्या घराघरांत अगदी आंब्याचा हंगाम संपेपर्यंत दरवळत राहतो. याच्याच जोडीला मुंबईचा वडापावदेखील नाशिककरांनी असा काही आपलासा केला आहे की, विविध प्रकारचे वडापाव स्टॉल्स नाशिकच्या गल्लोगल्ली थाटलेले दिसून येतील. पण, मधल्या काळात ‘मिसळ आणि नाशिक’ असे जणू समीकरणच रूढ होत गेले. त्याला कारणही तसेच होते. ’साधना’, ’तुषार’, ’श्यामसुंदर’, ’विहार’, ’पेरूची वाडी’, ’ग्रेप एम्बसी’, ’विठ्ठला मिसळ’, ’अण्णा मिसळ’, ’मामाचा मळा’ अशा कितीतरी मिसळींनी, नाशिककरांचा वीकेंड अगदी खासमखास केला. त्यात चुलीवरच्या मिसळने तर नाशिकच्या आणि बाहेरच्याही खवय्यांच्याही जिभेचे अगदी काल-परवापर्यंत चोचले पुरवले.
पण, दोन दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाने शहरातील तीन नामवंत मिसळ दुकानांवर कारवाई करत, या हॉटेलचालकांची काळी बाजू उघड केली. अस्वच्छता, अन्न तयार करण्याच्या ठिकाणी कीटक आणि इतर उपद्रवी जीव आणि खराब कच्चा माल वापरल्याचा ठपका ठेवत ’श्यामसुंदर’, ’विहार’ आणि ’तुषार मिसळ’वर कारवाईचा बडगा उचलत त्यांचे परवाने रद्दबातल केले. त्यामुळे आपण इतके दिवस अशी मिसळ खाऊन मिसळचालकांचे खिसे गरम केल्याचा पश्चात्ताप नाशिककरांना नक्कीच होत असेल. एकाची मिसळ खाऊन उरलेला रस्साच बहुतेक मिसळचालक दुसर्याला देतात, हे मिसळ खायला गेल्यावर चाणाक्षपणे लक्ष ठेवल्यास अथवा तिथल्या वेटरला विचारल्यास अगदी सहज लक्षात येईल. या गोष्टीला मिसळप्रेमी नाक मुरडतीलही, पण हेच सत्य असून आपण एखाद्या गोष्टीसाठी किती वाहवत जावे, याचा विचार करण्याची गरज या कारवाईवरून अधोरेखित झाल्याचे सर्वांनाच मान्य करावे लागेल. त्यामुळे आता मिसळ खायला जाताना भाऊ, अजून तर्री नकोच!
‘सायंतारा’ काळवंडला
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांनी, नाशिकमधील अनेक आस्थापनांच्या तोंडाला फेस आणला आहे. कारवाई होणार्या आस्थापनांची नावे बघून, तेथे खायला जाणार्यांचेच डोळे विस्फारले असतील. ’ग्राहकांच्या सेवेत’ अशी पाटी इतकी वर्षे आपल्या आस्थापनेवर अभिमानाने मिरवणार्या अनेकांचे परवाने रद्द करत, त्यांना ‘एफडीए’ने दणका दिला. यामध्ये सर्वांत लक्षात राहणारी कारवाई म्हणजे, ‘सायंतारा’ या साबुदाणा वडा विकणार्या आस्थापनेवरची. अस्वच्छतेमुळे त्याचा परवाना रद्द करण्यात आला. नाशिकचा ‘सायंतारा’ हे जुन्या नाशिकमधील भद्रकाली परिसरात असलेले एक अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक हॉटेल आहे. खासकरून उपवासाचे पदार्थ आणि कुरकुरीत साबुदाणा वड्यासाठी, हे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. भावसार कुटुंबाने १९६०च्या दशकाच्या अखेरीस, एका छोट्या हातगाडीवरून या व्यवसायाची सुरुवात केली. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ त्यांच्या तिन्ही पिढ्यांनी ही चव जपली. गरमागरम, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेला साबुदाणा वडा आणि उपवासाची बटाटा कचोरी, हे इथले मुख्य आकर्षण आहे. सोबत दिली जाणारी शेंगदाणा आणि ओल्या खोबर्याची चटणी या पदार्थांची चव आणखीच वाढवायची.
याशिवाय, येथील बटाटा चिवडा आणि डिंक लाडूदेखील नाशिककर आनंदाने घरी घेऊन जायचे. आषाढी एकादशी, महाशिवरात्री आणि नवरात्रीच्या दिवसांत विचारूच नका, एवढी गर्दी येथे झालेली बघायला मिळते. दररोज शेकडो किलो वडे आणि कचोरी नाशिककर आपल्या पोटात ढकलून, आपला उपवास सार्थकी लावायचे. नाशिककरांच्या जीवावरच भावसार कुटुंबाने, नाशिकच्या इतर भागातही त्यांच्या नवीन शाखा उघडल्या. पण, ज्या नाशिककरांनी आपल्या तीन पिढ्यांना सांभाळत विश्वासाने ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ म्हणत वड्याचे पैसे मोजले, त्याच नाशिककरांच्या पदरात उपवासाचे पुण्य सोडून, जर आजार पडणार असेल, तर या हॉटेल चालकांनी पुढच्या पिढ्यांपुढे नेमका कोणता आदर्श ठेवणार आहोत, असा एकदा तरी प्रश्न स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला नसेल का? अशी शंकेची पाल प्रत्येकाच्या मनात चुकचुकलीच पाहिजे. तूर्तास, नाशिकचा ‘सायंतारा’ काळवंडला, इतकेच!