बँका आकड्याने बनत नाहीत ; सर्वसामान्य माणसांच्या विश्वासातून घडतात!

पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहाच्या उदघाटन प्रसंगी महापौर रितू तावडे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर!

 
 
Mumbai Bank
 
मुंबई (Mumbai Bank): सामान्य माणसाची बँक मुंबई बँक आहे. बँका या आकड्याने बनत नाहीत त्या सामान्य माणसाच्या विश्वासातून घडत असतात असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहाच्या उदघाटन प्रसंगी केले. तर महापौर रितू तावडे यांनी मुंबईकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी मुंबई मनपा सहकार चळवळीच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून उभी राहील, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
 
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महापौर रितू तावडे, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, आमदार प्रमोद जठार, संचालक नंदकुमार काटकर, प्रकाश दरेकर, अनिल गजरे, विनोद बोरसे, विष्णू घुमरे, जिजाबा पवार, आनंदराव गोळे, पुरुषोत्तम दळवी, विठ्ठलराव भोसले, जयश्री पांचाळ, शिल्पा सरपोतदार, कविता देशमुख, तेजस्वी घोसाळकर, कार्यकारी संचालक संदीप सुर्वे, कर्मचारी प्रतिनिधी बंटी म्हशीलकर, भारत थोरात यांसह सहकार क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  (Mumbai Bank)
 
याप्रसंगी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुंबई बँकेच्या कार्याचे कौतुक करताना म्हणाले कि, वसंतदादा पाटील यांची ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून ओळख. पण सहकार चळवळीतील हाडामासाचा माणूस म्हणून महाराष्ट्रालाच नाही तर देशाला त्यांची ओळख आहे. सहकाराच्या माध्यमातून तळागाळातील माणसाच्या हातात पैसा पुरवायचा, त्यांना व्यवसायाची संधी द्यायची ही संकल्पना त्यांची होती. ती संकल्पना पूर्ततेस आणण्यासाठी मुंबई बँकेने अतोनात कष्ट केले आहेत. सामान्य माणसाची बँक मुंबई बँक आहे. बँका या आकड्याने बनत नाहीत त्या सामान्य माणसाच्या विश्वासातून घडत असल्याचेही नार्वेकर म्हणाले.  (Mumbai Bank)
 
तसेच ते पुढे म्हणाले कि, विधानसभेचा अध्यक्ष म्हणून काम करताना बँकिंग क्षेत्राला जास्तीत जास्त वाव व जास्तीत जास्त उपयोगाचे कायदे कसे बनतील याकडे लक्ष असते. आ. प्रवीण दरेकर यांनी नेहमीच सभागृहात बँकिंग सेक्टरवर भूमिका मांडली व सामान्य माणसाला न्याय द्यायचे काम केले. जी बँक बाराशे कोटीची उलाढाल करत होती ती दरेकरांच्या नेतृत्वात १६ हजार कोटींहून अधिक उलाढाल करताना पाहत आहोत. ही बँक राज्यातील सर्वोत्कृष्ट सहकार क्षेत्रातील बँक असेल याबद्धल कुणाच्याही मनात संदेह राहणार नाही, अशी भावनाही नार्वेकरांनी व्यक्त केली.  (Mumbai Bank)
 
तर महापौर रितू तावडे यांनी मुंबई बँकेच्या सभागृहाला पद्मभूषण वसंतदादा पाटील यांचे नाव देणे हा केवळ नामकरण सोहळा नसून ती वैभवशाली विचारांना दिलेली मानवानंदना असल्याचे म्हटले.  (Mumbai Bank)
 
तत्पूर्वी कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांनी पद्मभूषण वसंतदादा पाटील या सभागृहाच्या माध्यमातून शिक्षण प्रशिक्षणाचे काम, सहकारातील विविध कार्यक्रम होतील असे मुंबईतील सहकार चळवळीला, सहकार चळवळीतील नेत्यांना, कार्यकर्त्यांना आश्वस्त केले. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून मदत व पाठबळ देणारी राज्यातील संस्था मुंबई बँक असल्याचेही आ. दरेकर यावेळी म्हणाले. (Mumbai Bank)
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर