पेपरफुटीप्रकरणी दोषींना होणार ७ ते १० वर्षांचा कारावास; १० कोटी रुपयांचा दंड आणि मालमत्ता जप्त करण्याची शिफारस!

    24-Nov-2026   
 
 
Maharashtra Paper Leak
 
मुंबई (Maharashtra Paper Leak): राज्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता, विश्वासार्हता आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी राज्य शासनाने गठित केलेल्या उच्चस्तरीय समितीने आपला दुसरा अहवाल शासनास सादर केला आहे. पेपरफुटीप्रकरणी दोषींना ७ ते १० वर्षांचा कारावास, किमान १० कोटी रुपयांचा दंड तसेच संबंधितांची मालमत्ता जप्त करण्याची शिफारस समितीने केली आहे. या अहवालात पेपरफुटी, परीक्षांमधील गैरप्रकार आणि अनुचित साधनांचा वापर रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी करण्यासह परीक्षा संचालन, प्रशासकीय यंत्रणा, तंत्रज्ञानाचा वापर, सायबर सुरक्षा आणि उमेदवारांच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. व्ही. राधा समितीचा हा दुसरा अहवाल असून एकूण चार टप्प्यात अहवाल सादर होणार आहे.
 
संघटित परीक्षा गैरप्रकारांत सहभागी व्यक्ती व संस्थांना ७ ते १० वर्षे कारावास आणि किमान १० कोटी रुपयांचा दंड, गैरप्रकारांमधून झालेल्या नुकसानीची वसुली तसेच संबंधितांची मालमत्ता जप्त करण्याची शिफारस समितीने केली आहे. याशिवाय गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष कृती दल, खटल्यांच्या जलद निपटाऱ्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करणे आणि तपासाची जबाबदारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपविण्याचीही शिफारस करण्यात आली आहे. (Maharashtra Paper Leak)
 
एमपीएससी उमेदवारांना परीक्षा शुल्क परत करण्याची शिफारस
 
उमेदवारांच्या हिताच्या दृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याबाबत विचार करण्याची तसेच उत्तरतालिकेवरील उमेदवारांची हरकत मान्य झाल्यास हरकत नोंदविण्यासाठी भरलेले शुल्क परत करण्याची शिफारसही या अहवालात करण्यात आली आहे. (Maharashtra Paper Leak)
 
राज्यातील भरती व स्पर्धा परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने शासन निर्णय ४ सप्टेंबर २०२६ अन्वये उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क परीक्षेसंदर्भातील पहिला अहवाल ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सादर केला होता. त्यानंतर समितीने आपला दुसरा अहवाल २३ नोव्हेंबर २०२६ रोजी शासनास सादर केला आहे. (Maharashtra Paper Leak)
 
कायद्यात कठोर सुधारणांची शिफारस
 
परीक्षांमधील पेपरफुटी, संघटित गैरप्रकार आणि अनुचित साधनांचा वापर यांना प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) अधिनियम, २०२४ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याची शिफारस समितीने केली आहे. गैरप्रकारांमध्ये सहभागी व्यक्ती आणि संस्थांना कठोर शिक्षा होऊन अशा गुन्ह्यांना प्रतिबंध बसावा, या उद्देशाने कारावासाची शिक्षा, दंडाची रक्कम आणि काळ्या यादीत टाकण्याचा कालावधी वाढविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. (Maharashtra Paper Leak)
 
सध्याच्या कायद्यानुसार अशा प्रकरणांमध्ये ५ ते १० वर्षे कारावास, किमान १ कोटी रुपये दंड आणि परीक्षा खर्चाची वसुली अशी तरतूद आहे. समितीने ही शिक्षा वाढवून ७ ते १० वर्षे कारावास, किमान १० कोटी रुपये दंड, व्यापक नुकसानभरपाईची वसुली आणि मालमत्ता जप्तीची शिफारस केली आहे. अनुचित साधनांचा वापर करणाऱ्या व्यक्तींना सध्या ३ ते ५ वर्षे कारावास आणि १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. समितीने त्यात वाढ करून ५ ते १० वर्षे कारावास आणि ५० लाख रुपयांपर्यंत दंड प्रस्तावित केला आहे. (Maharashtra Paper Leak)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर