नागपूर(Devendra Fadnavis on Sharad Pawar) : शरद पवार आपल्या आयुष्यात कधीही थांबणार नाहीत. ते काहीतरी सकारात्मक करतच राहतील. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीची चर्चा करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शरद पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चेवर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "शरद पवार साहेबांना उत्तम आरोग्य लाभावे, ही आम्हा सर्वांची ईच्छा आहे. ते आजही सक्रीय आहेत. मी त्यांना जवळून बघितले आहे. पवार साहेब सातत्याने वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये आणि कामांमध्ये रूची घेत असतात. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीची चर्चा करणे योग्य नाही. ते आपल्या आयुष्यात कधीही थांबणार नाहीत. काही ना काही सकारात्मक करतच राहतील, असा मला विश्वास आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या चर्चा करण्याचे कारण नाही." (Devendra Fadnavis on Sharad Pawar)
कोयनेचे पाणी मुंबईला वळवण्यास होणाऱ्या विरोधावर बोलताना ते म्हणाले की, "कुठलाही अभ्यास न करता अनेक लोक यावर बोलत आहोत. आताचे कोयनेचे पाणी वळवण्याचा विषयच नाही. कोयनेचे जवळपास ६० टीएमसी पाणी वीज बनवल्यानंतर आपण सोडून देतो. ते पाणी कुणाच्या उपयोगात येत नसून थेट समुद्रात जाते. त्यावर आपण अभ्यास करत आहोत. हे पाणी वर आणावे लागेल. पण ते सोपे काम नाही. हे पाणी मुंबईकडे आणता आले तर, कोकणातील अनेक प्रकल्पांवर असलेला ताण कमी करता येईल आणि मुंबईला स्वयंपूर्ण करता येईल. काही लोकप्रतिनिधींनी यात कोकणाचाही विचार व्हावा अशी मागणी केली असून त्यावरही विचार करण्यात येईल. कुठलेही पाणी उचलले आणि घेऊन गेले असा विचारच नाही." (Devendra Fadnavis on Sharad Pawar)
वाया जाणारे पाणी महाराष्ट्राच्या वापराकरिता आणायचे आहे
"५० ते ६० वर्षे हे पाणी वाहून जात आहेत. सिंचनासाठी थेंबाचाही वापर होत नाही. तरीही कुणी त्याचा विचार करत नाही. आज आपण विचार केल्याबरोबर त्यावर वाद होत आहेत. आपल्याला महाराष्ट्राच्या हितासाठी काम करायचे असून सगळ्यांनी समजून घ्यावे. ज्या ज्या भागात पाणी नाही त्या भागात पाणी न्यायचे आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा आणि सांगलीच्या दुष्काळी भागात आपण पाणी नेले. त्यामुळे कुणाचेही पाणी पळवण्याचा विषय नसून वाया जात असलेले पाणी उचलून महाराष्ट्राच्या वापराकरिता आणायचे आहे. तरीही सगळ्यांचे समजून घेऊ, सगळ्यांना समजावून सांगू. अजून अभ्यास पूर्ण व्हायचा आहे. किती पाणी उचलता येईल याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यामुळे विनाकारण आताच त्यावरून वाद करणे योग्य नाही," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis on Sharad Pawar)
ते पुढे म्हणाले की, "ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे भारत-जपान मैत्रीअंतर्गत मॅडम ओगावा आणि अॅड. सुलेखा कुंभारे यांनी तयार केले. त्याचा आज २७ वा वर्धापन दिन असून त्यासाठी जपानच्या भिक्खू संघाचे ३० भंते आणि जगातील पाच हजार विहारांचे प्रमुख आज आले आहेत. त्यांच्या नेतृत्वात हा तीन दिवसीय सोहळा सुरु आहे. ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे जगाच्या नकाशावर आले आहे. महाराष्ट्र सरकारही इथे विविध प्रकल्प करत आहे. तसेच पवित्र दीक्षाभुमीलादेखील आंतरराष्ट्रीय दर्जा देऊन तिथले काम करत आहोत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध वस्तू असलेल्या शांतीवनचे कामही पूर्ण करत आणले आहे. हा संपूर्ण जागतिक वारसा आहे. आता तर ड्रॅगन पॅलेसपर्यंत मेट्रो पोहोचवली असून तिथल्या मेट्रो स्टेशनचे नाव 'ड्रॅगन पॅलेस टेम्पल मेट्रो स्टेशन' करणार आहे. भगवान गौतम बुद्ध यांचा विचार आणि त्यांचा धम्म एक असा मंत्र आहे जो संपूर्ण जगाला भारताशी जोडतो. आशियातील प्रगत देशांशी भारताची नाळ जोडणारा हा धम्म असल्याने त्यामाध्यमातून आपण जागतिक शांतता, सौहार्द आणि सहकार्याकरिता काम करू शकतो. महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमचे सरकार इथल्या विकासासाठी कटिबद्ध आहोत, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis on Sharad Pawar)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....