सरकारची अपेक्षा आणि उद्योगविश्वाची जबाबदारी

    24-Nov-2026   

 Private Investment in India
 
खासगी उद्योगांकडून अपेक्षित गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती होत नसल्याची खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिक्की’च्या व्यासपीठावर नुकतीच व्यक्त केली. त्यावर काँग्रेसचे प्रवीण चक्रवर्ती यांनी धोरणात्मक अनिश्चिततेचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे आर्थिक चर्चेला नवे वळण मिळाले आहे.
 
देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार वाढत असताना, खासगी उद्योगांकडून होणारी गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि उत्पादनांची गुणवत्ता यांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत. दि. १९ नोव्हेंबर रोजी ‘फिक्की’च्या शतकमहोत्सवी वार्षिक अधिवेशनात बोलताना त्यांनी उद्योगविश्वाला आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. देशाची १४० कोटींची बाजारपेठ हे केवळ विक्रीचे सुरक्षित ठिकाण समजण्याऐवजी जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करण्यासाठी तिचा आधार घ्यावा, असे त्यांनी बजावले. पुढील २० वर्षांच्या प्रत्येक दीर्घकालीन गुंतवणूक निर्णयात ‘इंडिया फर्स्ट’ हा विचार केंद्रस्थानी ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. पंतप्रधान मोदी यांच्या या भाषणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार प्रवीण चक्रवर्ती यांनी एका लेखात खासगी गुंतवणुकीतील संथपणाचे खापर सरकारच्या धोरणात्मक अनिश्चिततेवर फोडले. नोटाबंदी, अचानक लागू केलेली टाळेबंदी, सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाया आणि उद्योगसमूहांच्या अंतर्गत व्यवहारांत सरकारी हस्तक्षेप यांमुळे उद्योगविश्वाचा सरकारवरील विश्वास कमी झाला, असा त्यांचा युक्तिवाद आहे.
 
चक्रवर्ती यांनी २०१९ मधील कॉर्पोरेट करकपातीचा संदर्भ दिला आहे. त्यांच्या मते, करसवलतीमुळे उद्योगांकडे मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध झाला; मात्र त्याचे रूपांतर अपेक्षित गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीत झाले नाही. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार खासगी कंपन्यांची बचत ‘जीडीपी’च्या १०.५ टक्क्यांवरून ११.२ टक्क्यांपर्यंत पोहोचली, तर गुंतवणुकीचे प्रमाण १२ टक्क्यांवरच राहिले. उद्योगांनी करसवलतीचा लाभ घेतला; पण उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी त्याचा पुरेसा वापर केला नाही, असा त्यांचा आरोप. त्याचबरोबर, ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे अपेक्षित परिणाम मिळाले नसल्याचे सांगत, त्यांनी उत्पादन क्षेत्राच्या ‘जीडीपी’तील वाट्याबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. उद्योग उभारणीचे निर्णय काही महिन्यांसाठी घेतले जात नाहीत. पोलाद प्रकल्प, औषधनिर्मिती केंद्र, बंदर, ऊर्जा प्रकल्प किंवा सेमीकंडटर कारखाना उभारण्यासाठी मोठे भांडवल, तंत्रज्ञान आणि अनेक वर्षांचे नियोजन आवश्यक असते. त्यासाठी कररचना, जमीनविषयक नियम, पर्यावरणीय मंजुरी, वीजपुरवठा, कर्जव्यवस्था आणि सरकारी धोरण यांत स्थैर्य असणे गरजेचे आहे.
 
मात्र, खासगी गुंतवणूक ठप्प झाली आहे, असा एकांगी निष्कर्ष काढण्यास उपलब्ध आकडेवारी पुरेशी साथ देत नाही. रिझर्व्ह बँकेच्या सप्टेंबर २०२६ मधील अहवालानुसार, २०२५-२६ मध्ये बँका आणि वित्तसंस्थांनी १ हजार ३२ खासगी प्रकल्पांना कर्जमंजुरी दिली. या प्रकल्पांची एकूण किंमत ४.४ लाख कोटी रुपये इतकी होती. मागील वर्षी ९०७ प्रकल्पांची किंमत ३.७ लाख कोटी होती. बँककर्ज, परदेशी व्यावसायिक कर्ज आणि शेअर बाजारातून उभारलेल्या निधीचा एकत्रित विचार करता, २०२५-२६ मध्ये १ हजार ८३९ प्रकल्पांसाठी ५.६ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव नोंदले गेले. मागील वर्षी ही संख्या १ हजार ५८१ प्रकल्प आणि पाच लाख कोटी होती. या सर्व माध्यमांतून नियोजित भांडवली खर्चात ६.९ टक्के वाढ झाल्याचेही रिझर्व्ह बँकेने नमूद केले आहे. अर्थात, ही प्रकल्पमंजुरी आणि गुंतवणुकीची उद्दिष्टे आहेत; प्रत्यक्ष खर्चाची अंतिम आकडेवारी नव्हे. तरीही, खासगी गुंतवणुकीचे चित्र नकारात्मक नाही, हे स्पष्ट होते.
 
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या खासगी कंपन्यांच्या भांडवली खर्चविषयक सर्वेक्षणातही २०२५-२६ साठी ११.४४ लाख कोटींचा संभाव्य भांडवली खर्च नोंदवला गेला. मागील वर्षी कंपन्यांनी व्यक्त केलेल्या गुंतवणूक उद्दिष्टांपैकी ९६.३ टक्के खर्च प्रत्यक्ष झाल्याचे सर्वेक्षण सांगते. मात्र, याच सर्वेक्षणातील समान कंपन्यांच्या गटाचा विचार केला, तर तीन वर्षांतील एकत्रित खर्चवाढ मर्यादित दिसते. म्हणजे गुंतवणूक होत आहे; पण तिचा विस्तार सर्व उद्योगक्षेत्रांत समान वेगाने होत नाही. मोठ्या प्रकल्पांची घोषणा आणि प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणे, यांमध्ये कालावधी असतो. त्यामुळे गुंतवणुकीचे मूल्यमापन करताना घोषणा, मंजुरी, प्रत्यक्ष खर्च आणि निर्माण झालेला रोजगार हे चार वेगवेगळे निकष लक्षात घ्यावे लागतात.
 
चक्रवर्ती यांनी उत्पादनाचा ‘जीडीपी’तील वाटा घटल्याचा मुद्दा मांडला. मात्र, सांख्यिकी कार्यालयाने २०२२-२३ हा नवा आधारवर्ष स्वीकारल्यानंतर प्रसिद्ध केलेल्या सुधारित आकडेवारीनुसार उत्पादन क्षेत्राचा एकूण स्थूल मूल्यवर्धनातील वाटा २०२२-२३ मध्ये १४.७ टक्के होता, तो २०२५-२६ मध्ये १४.८ टक्के झाला. याच काळात स्थिर किमतींवरील उत्पादन क्षेत्राच्या मूल्यवर्धनात वार्षिक वाढही नोंदली गेली. जुन्या आणि नव्या आधारवर्षांतील आकडेवारीची थेट तुलना करणे योग्य नाही. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’चे यश मोजताना उत्पादनाचे मूल्य, निर्यात, आयात-अवलंबित्व, तंत्रज्ञान, रोजगार आणि जागतिक बाजारपेठेतील स्पर्धात्मकता यांचाही विचार आवश्यक आहे
 
मोदींनी ‘फिक्की’च्या व्यासपीठावर उद्योगांनी केवळ देशांतर्गत मागणीवर अवलंबून न राहता संशोधन, तंत्रज्ञान, मूल्यवर्धन आणि निर्यातक्षम उत्पादनाकडे वळावे, असेही सांगितले. त्यांनी उद्योगांना सरकारला सुधारणांच्या सूचना थेट पाठवण्याचे आवाहनही केले. म्हणजेच, सरकारकडून अपेक्षित बदलांची जबाबदारी मान्य करतानाच उद्योगविश्वाची स्वतःची जबाबदारीही त्यांनी अधोरेखित केली. खासगी गुंतवणुकीचा प्रश्न हा ‘सरकार विरुद्ध उद्योग’ असा सरळ संघर्ष नाही. सरकारने पायाभूत सुविधांवरील खर्च, उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजना, व्यापार करार आणि व्यवसायसुलभता यांद्वारे उद्योगांसाठी संधी निर्माण केल्या आहेत. परंतु, या संधींचे रूपांतर कारखाने, संशोधन, रोजगार आणि निर्यातीत करण्याची जबाबदारी उद्योगविश्वाची आहे. करकपात किंवा सवलत मिळाली, म्हणून कंपनीने नव्या प्रकल्पात गुंतवणूक केलीच पाहिजे, असा नियम नसतो; परंतु उपलब्ध संसाधने केवळ रोख राखीव किंवा आर्थिक व्यवहारांत गुंतवण्याऐवजी उत्पादक क्षमतेत वापरण्याची अपेक्षा रास्त आहे.
 
जागतिक मागणी, भू-राजकीय अस्थिरता, कच्च्या मालाचे दर, व्याजदर, तंत्रज्ञानातील बदल आणि देशांतर्गत ग्राहकांची क्रयशक्ती, हेही गुंतवणुकीवर परिणाम करणारे घटक आहेत. त्याचप्रमाणे उद्योगविश्वानेही सरकारी सवलतींची अपेक्षा न ठेवता, भारतीय बाजारपेठेला दर्जेदार उत्पादने, चांगले वेतन आणि रोजगाराच्या संधी दिल्या पाहिजेत. सरकारने विश्वासार्ह धोरणात्मक वातावरण निर्माण करावे आणि उद्योगांनी त्या वातावरणाचा उपयोग देशाच्या उत्पादनक्षमतेसाठी करावा. ‘विकसित भारत’ हे ध्येय सरकारच्या घोषणांनी किंवा उद्योगांच्या नफ्याने साध्य होणार नाही. त्यासाठी सरकार आणि उद्योगविश्व यांच्यात परस्पर विश्वास, स्पष्ट जबाबदारी आणि दीर्घकालीन राष्ट्रीय दृष्टिकोन यांची सांगड घालणे, हाच खरा मार्ग आहे.




संजीव ओक

स्तंभलेखक, आर्थिक, आंतरराष्ट्रीय तसेच भू-राजकीय घडामोडी, ऊर्जा या विषयाचे अभ्यासक
संबंधित मजकूर