मुंबई : मुंबई आणि अलिबागदरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी रेवस-करंजा सागरी सेतू प्रकल्पाच्या कामाला आता वेग आला आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ रखडलेल्या या प्रकल्पामुळे मुंबई, उरण आणि अलिबागदरम्यानची वाहतूक कनेक्टिव्हिटी सुधारण्याची अपेक्षा आहे. भाजप आमदार महेश बालदी यांनी नुकतीच या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा सविस्तर आढावा घेतला.
रेवस-करंजा सागरी सेतू उरण आणि अलिबाग यांना थेट जोडणार असून, या पुलामुळे सध्या रस्ते आणि जलमार्गांवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना पर्यायी आणि जलद मार्ग उपलब्ध होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते अलिबागचा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण करता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या सागरी सेतूमुळे कोकणातील पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्यासोबतच शिक्षण, आरोग्य सेवा, रोजगार आणि व्यापाराच्या संधीही वाढणार आहेत. उरण आणि अलिबाग परिसरातील नागरिकांना मुंबईशी अधिक सुलभ संपर्क उपलब्ध होणार असून, या भागाच्या आर्थिक विकासालाही गती मिळण्याची मिळेल.
यावेळी भाजपचे उरणचे आमदार महेश बालदी, भाजप चाणजे विभाग अध्यक्ष जितेंद्र घरत, तसेच अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट कंट्रोलर वैकुंठ पै, प्रोजेक्ट मॅनेजर दत्तात्रय कोरे, मरीन वर्क मॅनेजर प्रसाद म्हात्रे, फॅब्रिकेशन मॅनेजर लक्ष्मीकांत राऊतकर आणि अॅडमिन मॅनेजर नागनाथ शिंदे उपस्थित होते.
रेवस-करंजा सागरी सेतू हा केवळ वाहतुकीचा प्रकल्प नसून कोकणाच्या विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प ठरणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि कोकणातील अंतर कमी होऊन पर्यटन, उद्योग आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.