स्वदेशी अणुभट्टीचा महत्त्वाचा टप्पा पार; रावतभाटा अणुभट्टीत अणुशृंखला अभिक्रिया सुरू करण्यास मंजुरी!

 
 
RAPP-8 Reactor
 
मुंबई (RAPP-8 Reactor): भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती झाली असून, राजस्थानातील रावतभाटा अणुऊर्जा प्रकल्पातील आठव्या अणुभट्टीला नियंत्रित अणुशृंखला अभिक्रिया सुरू करण्यासाठी अणुऊर्जा नियामक मंडळाने मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ७०० मेगावॅट क्षमतेच्या दाबयुक्त जड पाणी अणुभट्टीच्या व्यावसायिक वीजनिर्मितीच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे.
 
रावतभाटा अणुऊर्जा प्रकल्पातील RAPP-8 अणुभट्टीला १९ नोव्हेंबर २०२६ रोजी 'फर्स्ट अॅप्रोच टू क्रिटिकलिटी'साठी मंजुरी मिळाली. अणुभट्टीची रचना, कार्यान्वयन चाचण्यांचे निष्कर्ष आणि विविध तांत्रिक बाबींचा आढावा घेतल्यानंतर नियामक मंडळाने ही परवानगी दिली. या प्रक्रियेत सात महत्त्वाच्या क्षेत्रांचे परीक्षण करण्यात आले. (RAPP-8 Reactor)
 
'क्रिटिकलिटी' म्हणजे काय?
 
अणुभट्टीमध्ये नियंत्रित आणि स्वयंपूर्ण अणुशृंखला अभिक्रिया प्रथमच कमी शक्तीवर सुरू होण्याच्या प्रक्रियेला 'क्रिटिकलिटी' म्हणतात. या टप्प्यानंतर अणुभट्टीच्या कार्यक्षमतेची आणि सुरक्षिततेची विविध चाचणी केली जाते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वीजनिर्मितीची क्षमता वाढविण्यात येते.RAPP-8 मध्ये सप्टेंबर २०२६ मध्ये अणुइंधन भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यासाठी यापूर्वी अणुऊर्जा नियामक मंडळाची मंजुरी मिळाली होती. आता क्रिटिकलिटीसाठी मंजुरी मिळाल्याने प्रकल्प व्यावसायिक वीजनिर्मितीच्या दिशेने पुढे सरकला आहे. (RAPP-8 Reactor)
 
देशातील स्वदेशी ७०० मेगावॅट अणुभट्ट्यांच्या मालिकेतील चौथा प्रकल्प
 
रावतभाटा येथील RAPP-8 हा देशात उभारण्यात येत असलेल्या १६ स्वदेशी ७०० मेगावॅट क्षमतेच्या दाबयुक्त जड पाणी अणुभट्ट्यांच्या मालिकेतील चौथा अणुभट्टी प्रकल्प आहे. गुजरातमधील काकरापार अणुऊर्जा प्रकल्पातील पहिल्या दोन अणुभट्ट्यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये व्यावसायिक वीजनिर्मिती सुरू केली. त्यानंतर रावतभाटा येथील सातव्या अणुभट्टीने एप्रिल २०२५ मध्ये व्यावसायिक वीजनिर्मिती सुरू केली. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या प्रकल्पाचे संचालन करते. RAPP-8 मध्ये क्रिटिकलिटी साध्य झाल्यानंतर कमी शक्तीवरील भौतिकशास्त्रीय चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यानंतर अणुभट्टीची क्षमता टप्प्याटप्प्याने वाढवून वीज ग्रिडशी जोडण्याचे नियोजन आहे. (RAPP-8 Reactor)
 
भारताच्या अणुऊर्जा विस्तार कार्यक्रमाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा आहे. देशात सध्या २४ अणुऊर्जा अणुभट्ट्या कार्यरत असून त्यांची एकूण स्थापित क्षमता ८.७८ गिगावॅट आहे. याशिवाय १८ अणुभट्ट्यांचे प्रकल्प एकूण १३.६ गिगावॅट क्षमतेसह बांधकामाधीन किंवा पूर्व-प्रकल्प प्रक्रियेत आहेत. स्वदेशी अणुऊर्जा तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळे देशाच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार आहे. (RAPP-8 Reactor)
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर