जंगल ही केवळ उपजीविकेची जागा नसून, सामूहिक स्वावलंबनाचा आधार ठरू शकते, हे गडचिरोलीतील कोरची तालुक्यातील आदिवासी गावांनी दाखवून दिले आहे. वनहक्कांच्या बळावर ९० ग्रामसभांनी एकत्र येत, तेंदूपत्ता, बांबू आणि अन्य वनसंपत्तीच्या व्यवस्थापनापासून विक्रीपर्यंतची सूत्रे आपल्या हाती घेतली. यातून कोट्यवधींची उलाढाल, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि गावविकासाचा नवा मार्ग उभा राहिला. या अनोख्या समुदायाधारित वनव्यवस्थापनाची दखल घेत, कोरची महाग्रामसभेला २०२६चा ‘टी. एन. खोशू स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील आदिवासी गावांनी जंगलाकडे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून न पाहता, सामूहिक स्वायत्तता आणि आर्थिक सक्षमीकरणाचा आधार म्हणून पाहिले. ग्रामसभांच्या माध्यमातून वनसंपत्तीवरील हक्क मिळवणे, तिचे संवर्धन करणे आणि त्यातून निर्माण होणार्या उत्पन्नाचे व्यवस्थापन स्वतः करणे, असा एक वेगळा मार्ग येथील गावांनी विकसित केला आहे. याच लोककेंद्री आणि समुदायाधारित व्यवस्थेची दखल घेत कोरची महाग्रामसभेला २०२६चा ‘टी. एन. खोशू स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार केवळ एका संस्थेचा सन्मान नसून, जंगलावर अवलंबून असलेल्या समुदायांच्या स्वशासनाच्या प्रयोगाला मिळालेली राष्ट्रीय स्तरावरील मान्यता आहे.
‘असोसिएशन फॉर ट्रॉपिकल बायोलॉजी अॅण्ड एन्व्हायर्नमेंटल रीसर्च’ (ATREE)) या संस्थेतर्फे आयोजित होणारा २३वा ‘टी. एन. खोशू स्मृती पुरस्कार’ आणि व्याख्यान कार्यक्रम यंदा दोन पुरस्कारार्थींना गौरवणार आहे. त्यामध्ये कोरची महाग्रामसभेसह गुजरातमधील ‘आर्च’ वाहिनी या संस्थेचा समावेश आहे. पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. टी. एन. खोशू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा हा पुरस्कार पर्यावरण संवर्धन आणि समुदायांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करतो. कोरचीचा सन्मान विशेष महत्त्वाचा आहे; कारण येथे वनसंवर्धनाची संकल्पना केवळ संरक्षणापुरती मर्यादित न राहता, स्थानिक अर्थव्यवस्था, लोकशाही आणि उपजीविकेशी जोडली गेली आहे.
कोरची तालुका गडचिरोलीच्या जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ९२ किमी अंतरावर आहे. २०११च्या जनगणनेनुसार तालुक्याची लोकसंख्या ४२ हजार ८४४ असून, त्यांपैकी ७३ टक्के लोकसंख्या अनुसूचित जमातींची आहे. गोंड आणि कंवर हे येथील प्रमुख आदिवासी समुदाय आहेत. तालुक्यात एकूण १३३ गावे आणि ग्रामसभा आहेत. त्यांपैकी ९० ग्रामसभांनी एकत्र येऊन महाग्रामसभेची स्थापना केली. गावपातळीवरील निर्णयप्रक्रिया आणि तालुकास्तरीय समन्वय यांची सांगड घालणारी ही संघटना आहे. तिच्या रचनेत तीन इलाका सभा, सात समूह सभा आणि गावपातळीवरील ग्रामसभा अशा विविध स्तरांचा समावेश आहे.
या व्यवस्थेच्या उभारणीमागे ‘वनहक्क कायदा २००६’ आणि ‘अनुसूचित क्षेत्रातील पंचायत विस्तार कायदा’ अर्थात ‘पेसा’ यांची महत्त्वाची भूमिका आहे. या कायद्यांमुळे ग्रामसभांना सामुदायिक वनसंसाधनांवरील अधिकार मिळवण्याची संधी निर्माण झाली. मात्र, कायदेशीर अधिकार मिळणे आणि प्रत्यक्ष आर्थिक स्वायत्तता प्राप्त होणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कोरचीतील ग्रामसभांनी हा फरक ओळखून वनसंपत्तीच्या व्यवस्थापनापासून विक्रीपर्यंतची प्रक्रिया स्वतःच्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न केला. त्यातून तेंदूपत्ता आणि बांबूच्या व्यापारासाठी स्वतंत्र सामूहिक यंत्रणा विकसित झाली.
कोरचीचा प्रयोग आव्हानांपासून मुक्त नाही. बाजारभावातील चढ-उतार, कंत्राटदारांवरील काही प्रमाणातील अवलंबित्व आणि प्रशासकीय अडथळे यांचा परिणाम व्यवहारांवर होतो. तरीही ग्रामसभांनी स्वतःचे निर्णय, नोंदी, सामूहिक वाटाघाटी आणि निधी व्यवस्थापन विकसित केले आहे. जंगलाचे संवर्धन आणि स्थानिक उपजीविका परस्परविरोधी नसून एकमेकांना बळ देऊ शकतात, हे या उदाहरणातून दिसते.
‘टी. एन. खोशू स्मृती पुरस्कारा’मुळे कोरची महाग्रामसभेच्या या प्रवासाकडे व्यापक स्तरावर लक्ष वेधले गेले आहे. वनहक्कांची अंमलबजावणी म्हणजे केवळ कागदावरील अधिकार नव्हे; तर संसाधनांवरील नियंत्रण, न्याय्य मोबदला, पारदर्शक व्यवहार आणि सामूहिक निर्णयक्षमता यांची प्रत्यक्ष उभारणी होय. गडचिरोलीतील या गावांनी उभा केलेला नमुना वनाधारित अर्थव्यवस्थेला समुदायाच्या हातात ठेवण्याची क्षमता दाखवतो. त्यामुळे हा पुरस्कार एका संस्थेच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच ग्रामसभांच्या नेतृत्वाखालील वनसंवर्धन आणि आर्थिक स्वायत्ततेच्या दिशेने टाकलेल्या पावलांचीही नोंद घेतो.
‘तेंदूपत्ता’ मुख्य आधार
तेंदूपत्ता हा येथील अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. बिडीनिर्मितीसाठी वापरल्या जाणार्या या पानांच्या संकलनातून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो. पूर्वी वनविभागाच्या व्यवस्थेत तेंदूपत्ता संकलन आणि विक्री होत असताना ग्रामसभांना व्यापारातील रॉयल्टी किंवा उत्पन्नाचा पारदर्शक लाभ मिळत नव्हता. संकलित पानांचे नेमके प्रमाण किती, त्यातून किती उत्पन्न मिळाले, याची माहितीही ग्रामसभांना सहज उपलब्ध होत नसे. मजुरीचे पैसे मिळण्यासाठी अनेकदा महिने, कधी वर्षभर प्रतीक्षा करावी लागत असे. या पार्श्वभूमीवर ग्रामसभांनी ‘तेंदूपत्ता संकलन केंद्रां’चे व्यवस्थापन, उत्पादनाची गुणवत्ता आणि विक्रीची प्रक्रिया सुधारण्यावर भर दिला. सामूहिक पद्धतीने बाजारात व्यवहार केल्यामुळे अधिक चांगला दर मिळवणे आणि संकलकांना जलद पैसे देणे शक्य झाले. या प्रक्रियेत महिलांचा सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. तेंदूपत्ता संकलनात महिलांना पुरुषांइतकीच मजुरी मिळाल्याची नोंद अहवालात आहे. महिलांच्या स्वतंत्र संघटनांनी ग्रामसभा आणि तालुकास्तरीय निर्णयप्रक्रियेत आपला आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
आर्थिक उलाढालीचा चढता आलेख
या बदलाचे आर्थिक परिणाम आकडेवारीतून स्पष्ट होतात. २०१७ मध्ये तेंदूपत्त्याच्या एका मानक पोत्याचा दर ११ हजार ९१० रुपये ३९ पैसे इतका नोंदवला गेला. त्यावर्षी तालुक्यातील ८७ ग्रामसभांच्या तेंदूपत्ता व्यवहारातून एकूण १० कोटी ७९ लाख ८७ हजार ९७० रुपयांचे उत्पन्न नोंदले गेले. याचवर्षी तालुक्यातील ६७ टक्के लोकसंख्या तेंदूपत्ता संकलनात सहभागी झाली; त्यात महिलांचे प्रमाण ४९ टक्के होते. चार सदस्यांच्या एका कुटुंबाला १५ दिवसांच्या संकलनातून सरासरी २१ हजार रुपये मिळाल्याची नोंद अहवालात आहे.
२०१८ मध्ये बाजारातील घसरणीमुळे मानक पोत्याचा दर ४ हजार ६०० रुपयांवर आला आणि ग्रामसभांचा सामूहिक निधी ११ लाख ६ हजार ५०४ रुपये राहिला. २०१९ मध्ये दर ५ हजार ७०० रुपये झाला आणि ग्रामसभांनी १ कोटी १५ लाख ४८ हजार ३०९ रुपये सामूहिक उत्पन्न नोंदवले. २०२० मध्ये दर ६ हजार रुपये असताना एकूण उत्पन्न ४ कोटी ७४ लाख ७२ हजार ९९० रुपये होते. त्यांपैकी ३ कोटी ७९ लाख ७८ हजार ३९२ रुपये संकलक कुटुंबांना मिळाले, तर ९४ लाख ९४ हजार ५९८ रुपये ग्रामविकासासाठी राखले गेले.
या निधीचा उपयोग केवळ आर्थिक व्यवहारापुरता मर्यादित नाही. वनउत्पादनांच्या विक्रीतून मिळणार्या रॉयल्टीपैकी साधारण पाच ते २० टक्के रक्कम ग्रामसभा ‘गावविकास निधी’ म्हणून राखून ठेवतात. काही गावांनी ‘वनहक्क’ आणि ‘पेसा’अंतर्गत ताब्यात आलेल्या पाणथळ क्षेत्रांतील मत्स्यव्यवसायही स्वतः आयोजित केला. पूर्वी बाहेरील कंत्राटदारांना दिले जाणारे हे काम ग्रामस्थांनी हाती घेतल्याने अन्नाची गरज भागवण्याबरोबरच सहभागी कुटुंबांना उत्पन्न आणि ग्रामसभेला विकासनिधी मिळू लागला. बांबू आणि इतर गौण वनउत्पादनांचे व्यवस्थापनही या स्थानिक अर्थव्यवस्थेचा भाग आहे.