उल्हासनगर (Ulhasnagar Development) : उल्हासनगरच्या शैक्षणिक, आर्थिक आणि पायाभूत विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उल्हासनगर येथे हैदराबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट बोर्डाच्या शैक्षणिक इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंधी समाजाच्या संघर्षमय प्रवासाचा गौरव करत शिक्षण, कौशल्य विकास आणि शहराच्या पायाभूत सुविधांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.
फाळणीनंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानातून भारतात आलेल्या सिंधी समाजाने आपली घरे, मालमत्ता आणि व्यवसाय मागे सोडून नव्याने आयुष्य उभे केले. मेहनत, जिद्द आणि उद्यमशीलतेच्या जोरावर या समाजाने उद्योग, वैद्यकीय, आर्थिक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या समाजाने संघर्षातून उभी केलेली यशस्वी वाटचाल प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Ulhasnagar Development)
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, स्वातंत्र्यानंतर १९४९ मध्ये वांद्रे येथे नॅशनल कॉलेजची स्थापना झाली. त्यानंतर एचएसएनसी संस्थेचा विस्तार होत गेला. आज या संस्थेच्या माध्यमातून सुमारे २७ शैक्षणिक संस्था चालवल्या जात असून, जवळपास १४ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. समाजनिर्मितीच्या उद्देशाने संस्थेने उभारलेला शैक्षणिक वारसा आणि जगभरात विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले संस्थेचे माजी विद्यार्थी ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या भारतच्या संकल्पनेशी आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत असलेली श्रीमती चांदीबाई हिमथमल मनसुखानी महाविद्यालयाची आधुनिक इमारत विद्यार्थ्यांना नवी दिशा देईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. (Ulhasnagar Development)
आजच्या काळात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून, त्यासोबत उपयोजित ज्ञान आणि प्रत्यक्ष कामात उपयोगी पडणारी कौशल्ये असणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. बदलत्या रोजगार बाजारपेठेच्या आणि अर्थव्यवस्थेच्या गरजांनुसार कुशल मनुष्यबळ विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
भारताकडे तरुण लोकसंख्येचा मोठा लाभ आहे. या तरुणाईला कौशल्याधारित मनुष्यबळात रूपांतरित केल्यास देश स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासोबतच जगालाही कुशल मनुष्यबळ पुरवू शकेल, असे त्यांनी नमूद केले. (Ulhasnagar Development)
उल्हासनगरच्या विकासाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहराचा समावेश मुंबई महानगर प्रदेशाच्या व्यापक विकास संकल्पनेत करण्यात आल्याचे सांगितले. शहरात मेट्रोची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असून, यामुळे उल्हासनगरची कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होणार आहे. (Ulhasnagar Development)
याशिवाय काँक्रीट रस्ते, उड्डाणपूल आणि स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची योजना यांसारख्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली असून, ही कामे सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले.
उल्हासनगरमधील अनधिकृत ठरवण्यात आलेल्या घरांना अधिकृत करून क्लस्टर योजनेच्या माध्यमातून शहराचा व्यापक आणि नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करण्याचा सरकारचा मानस असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. (Ulhasnagar Development)
तसेच उल्हासनगरमधील सिंधी समाजातील नागरिकांना जमिनीच्या मालकीहक्काचे पट्टे देऊन जमिनी फ्रीहोल्ड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रक्रियेची सुरुवात नागपूरमधून झाली असून, लवकरच उल्हासनगरमध्येही ती राबविण्यात येईल. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार आवश्यक ते सहकार्य करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या कार्यक्रमाला आमदार कुमार आयलानी, आमदार किसन कथोरे, आमदार सुलभा गायकवाड, एचएसएनसी बोर्डाचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी, बोर्डाचे विश्वस्त किशू मनसुखानी, अनिल हरीश, माया शहानी, सी.एच.एम. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजू लालवाणी पाठक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. (Ulhasnagar Development)