
ठाणे ,(Thane Mahanagar Gas Connections):ठाणे शहरातील ३९ हजारांहून अधिक कुटुंबांना गेल्या चार वर्षांत महानगर गॅसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे रखडलेल्या आणखी १४ सोसायट्यांच्या गॅस जोडण्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. ही सर्व प्रलंबित कामे १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.
शहरातील अनेक इमारतींमध्ये अद्याप पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा सुरू झालेला नाही. या पार्श्वभूमीवर केळकर यांनी शुक्रवारी महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेतली. यामध्ये संबंधित सोसायट्यांचे रहिवासी प्रतिनिधी, महापालिका अधिकारी आणि कंत्राटदारांना सहभागी करून प्रत्येक ठिकाणच्या अडचणींचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.(Thane Mahanagar Gas Connections)
पोलीस वसाहतींमधील इमारतींनाही महानगर गॅसची जोडणी देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. सावरकरनगरमधील म्हाडाच्या सलग इमारतींमध्येही अद्याप गॅस जोडणी झालेली नसल्याने तेथील रहिवाशांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून कामे वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.केवळ जोडण्यांचे नियोजन करून न थांबता प्रत्येक इमारतीपर्यंत प्रत्यक्ष गॅसपुरवठा सुरू होईपर्यंत नियमित पाठपुरावा करणार असल्याचे केळकर यांनी स्पष्ट केले.(Thane Mahanagar Gas Connections)
या बैठकीला नगरसेवक सुरेश कांबळे, माजी महापौर मनोहर गाढवे, विशाल वाघ, निलेश कोळी यांच्यासह महानगर गॅसचे अधिकारी आणि संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते.(Thane Mahanagar Gas Connections)