नागपूर,(Chandrashekhar Bawankule Kamathi Village Visit) : सध्याची दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत जिरविण्यासाठी गावागावांत जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. भूजल पातळी वाढविण्यासोबतच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता कायम ठेवण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
कामठी विधानसभा मतदारसंघातील मौदा तालुक्यात शनिवारी त्यांनी सुमारे १० गावांचा दौरा केला. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या दौऱ्यात विविध विकासकामांची पाहणी, जलसंधारण प्रकल्पांचा आढावा, पात्र लाभार्थ्यांना मालकी हक्काच्या पट्ट्यांचे वितरण तसेच ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर भर देण्यात आला.(Chandrashekhar Bawankule Kamathi Village Visit)
जलसंधारणाच्या कामांची पाहणी
दौऱ्यादरम्यान बेरडेपार येथे तयार करण्यात आलेल्या ताडपत्री माती बंधाऱ्यांची पाहणी बावनकुळे यांनी केली. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यासाठी अशा बंधाऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यामुळे भूजल पातळीत वाढ होऊन परिसरातील शेतीला पाण्याचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देऊन गावागावांत अशा उपाययोजना राबविण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी बेरडेपार येथील नवनिर्मित समाज भवनाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.(Chandrashekhar Bawankule Kamathi Village Visit)
भांडेवाडी येथे उभारण्यात आलेल्या ताडपत्री माती बंधाऱ्यांचीही त्यांनी पाहणी केली. ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
पात्र लाभार्थ्यांना मालकी हक्काचे पट्टे
'सर्वांसाठी घर' या संकल्पनेच्या पूर्ततेच्या दिशेने मौदा तालुक्यातील भांडेवाडी ग्रामपंचायत, अडेगाव गट ग्रामपंचायत आणि तोंडली गट ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय जमिनीवरील पात्र अतिक्रमणे नियमानुकूल करून लाभार्थ्यांना मालकी हक्काचे पट्टे वितरित करण्यात आले. त्यामुळे अनेक कुटुंबांना आपल्या निवासस्थानाबाबत मालकी हक्काची सुरक्षितता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.(Chandrashekhar Bawankule Kamathi Village Visit)
गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या
धर्मापुरी, खात, घोटमुंढरी आणि मांगली (तेली) यांसह विविध गावांना भेटी देऊन बावनकुळे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. रस्ते, पाणी, शेती, महसूल आणि मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न ग्रामस्थांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. केवळ निवेदने स्वीकारून न थांबता त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही झाली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.(Chandrashekhar Bawankule Kamathi Village Visit)
एनटीपीसी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल
मौदा येथील एनटीपीसी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अन्नत्याग आंदोलनस्थळी भेट देऊन बावनकुळे यांनी आंदोलकांशी संवाद साधला आणि त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. नगराध्यक्ष प्रसन्ना (राजा) तिडके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल घेत त्यांनी एनटीपीसी मौदाचे कार्यकारी संचालक जोसेफ बास्टियन तसेच संबंधित प्रशासनाला प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या.(Chandrashekhar Bawankule Kamathi Village Visit)
एका दिवसात सुमारे १० गावांना भेटी देत बावनकुळे यांनी ग्रामीण भागातील विकासकामांचा आढावा घेतला. जलसंधारण, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता, घरकुलांसाठी मालकी हक्काचे पट्टे आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न अशा महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा आणि त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचा प्रयत्न या दौऱ्यातून करण्यात आला.
या दौऱ्यादरम्यान माजी आमदार टेकचंद सावरकर, भाजप तालुका मंडळ अध्यक्ष भगवान बावनकुळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निशाताई सावरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य राधाताई अग्रवाल, मुकेश अग्रवाल, रामेश्वर लिचडे, नरेश बावनकुळे यांच्यासह विविध गावांचे सरपंच, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Chandrashekhar Bawankule Kamathi Village Visit)