‘ग्लोबल पीस ऑनर्स २०२६’ पुरस्कार बी. प्रभाकरन यांना प्रदान; गडचिरोलीत औद्योगिक व्यवस्था उभारण्याचे ध्येय!

औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि सामाजिक विकासातील योगदानाबद्दल गौरव

    22-Nov-2026
 
B Prabhakaran Global Peace Honours 2026
 
मुंबई (B Prabhakaran Global Peace Honours 2026) : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांना महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ‘ग्लोबल पीस ऑनर्स २०२६’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. औद्योगिक विकास, रोजगारनिर्मिती आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बी. प्रभाकरन यांनी हा सन्मान गडचिरोलीच्या जनतेला समर्पित केला. तसेच, या विकासप्रक्रियेत स्थानिक नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
 
मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे दिव्यज फाउंडेशनच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह अभिनेते शाहरुख खान, रणवीर सिंह आणि अक्षय कुमार तसेच मनोरंजन, क्रीडा आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.  (B Prabhakaran Global Peace Honours 2026)
 
या प्रसंगी बोलताना बी. प्रभाकरन म्हणाले, “गडचिरोलीमध्ये शाश्वत विकासाला चालना देणारी, स्थानिक समुदायांच्या आकांक्षांशी जोडलेली आणि पर्यावरणाचा विचार करणारी औद्योगिक व्यवस्था उभारण्याचे आमचे ध्येय आहे. औद्योगिक विकासाचा लाभ केवळ कारखान्यांपुरता मर्यादित न राहता त्यातून स्थानिक तरुणांना कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात, तसेच कुटुंबांना उत्तम आरोग्यसेवा, शिक्षण आणि उपजीविकेच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. स्थानिक समुदायांचा सहभाग आणि विश्वास यांच्याशिवाय ही प्रगती शक्य नाही. गडचिरोलीच्या जनतेने आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. हा पुरस्कार त्यांचाच आहे. त्यांचा विश्वास हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा असून, त्यांची प्रगती हीच माझी सर्वोच्च बांधिलकी आहे.” (B Prabhakaran Global Peace Honours 2026)
 
बी. प्रभाकरन यांच्या नेतृत्वाखाली लॉयड्स मेटल्सने १७,५०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा रोजगारक्षम समूह उभारला आहे. यामध्ये सुमारे १४,५०० पुरुष आणि ३,००० महिलांचा समावेश आहे. याशिवाय, गडचिरोलीमध्ये एकात्मिक पोलाद प्रकल्प उभारण्यासाठी कंपनीने २५,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे नियोजन केले आहे.
 
कंपनीने स्थानिक तरुणांच्या कौशल्य विकासासाठी बोडली येथे ‘लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल अँड आंत्रप्रेन्योरशिप’ (LMGSE) अकादमी सुरू केली आहे. या अकादमीच्या माध्यमातून औद्योगिक कौशल्ये, वाहनचालक प्रशिक्षण, लॉजिस्टिक्स, हॉस्पिटॅलिटी, डिजिटल कौशल्ये आणि खाण सुरक्षा अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत या अकादमीमध्ये १,००० हून अधिक प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण घेतले असून, १०० टक्के रोजगारप्राप्तीची नोंद झाली आहे. यामध्ये ४०० महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश असून, ३० हून अधिक विविध कौशल्य अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. (B Prabhakaran Global Peace Honours 2026)
 
‘लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन’च्या माध्यमातून कंपनी आरोग्य, शिक्षण आणि उपजीविका विकासाशी संबंधित विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. कंपनीच्या आरोग्यविषयक उपक्रमांचा आतापर्यंत २.७६ लाखांहून अधिक नागरिकांना लाभ झाला आहे. यासाठी २५ हून अधिक मोबाइल आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, ४९७ हून अधिक संस्थात्मक प्रसूतींना मदत करण्यात आली आहे. ‘लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल’च्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवल्या जातात. यामध्ये मोफत बाह्यरुग्ण तपासणी, शस्त्रक्रिया आणि माता आरोग्य सेवांचाही समावेश आहे. (B Prabhakaran Global Peace Honours 2026)
 
शिक्षण क्षेत्रात ‘लॉयड्स राज विद्या निकेतन’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच निवासी सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात. कंपनीच्या विविध शैक्षणिक उपक्रमांतर्गत एकूण २,५०० विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यापैकी २,१०० हून अधिक विद्यार्थी निवासी सुविधांचा लाभ घेत आहेत. एकूण विद्यार्थीसंख्येत मुलींचे प्रमाण ४५.७ टक्के आहे. याशिवाय, ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी ३० हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना कंपनीने संपूर्ण शिष्यवृत्तीच्या माध्यमातून सहकार्य केले आहे. (B Prabhakaran Global Peace Honours 2026)
 
शेती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कंपनीने ३५० हून अधिक शेतकऱ्यांना मदत केली आहे. या उपक्रमातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या उत्पन्नात ११० टक्क्यांची वाढ झाल्याची नोंद आहे. तसेच, समाजाच्या मुख्य प्रवाहात पुनर्वसन आणि पुनर्समावेश होण्याच्या उद्देशाने आत्मसमर्पण केलेल्या ९६ हून अधिक नक्षलवादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय, ‘वन्या गारमेंट सेंटर’च्या माध्यमातून स्थानिक महिलांना कौशल्य विकसित करून स्वावलंबी होण्यासाठी आणि उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यासाठी संधी दिली जात आहे. (B Prabhakaran Global Peace Honours 2026)
 
या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून गडचिरोलीतील औद्योगिक विकासासोबतच स्थानिक नागरिकांना आरोग्यसेवा, शिक्षण आणि रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचा लॉयड्स मेटल्सचा प्रयत्न आहे. औद्योगिक प्रगतीचा लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवून या प्रदेशाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्याच्या दिशेने कंपनी कार्यरत आहे. (B Prabhakaran Global Peace Honours 2026)
 




संबंधित मजकूर