वॉशिंग्टन (US ICE Airport Arrest) : अमेरिकेतील सिएटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) या यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी विमानात चढण्यासाठी निघालेल्या दोन प्रवाशांना जेट ब्रिजवरच ताब्यात घेतल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या कारवाईमुळे लॉस एंजेलिसला जाणाऱ्या अलास्का एअरलाइन्सच्या विमानालाही विलंब झाला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, एका महिलेचा अधिकाऱ्यांसमोर आक्रोश करतानाचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
ICEने ‘एक्स’वर दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ८.०५ वाजता विशेष कारवाईअंतर्गत मेक्सिकोचा नागरिक रिकार्डो लारोंडो मेंडोझा याला अटक करण्यात आली. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही तो अमेरिकेत वास्तव्यास असल्याचा आरोप आहे. (US ICE Airport Arrest)
ही घटना सकाळी सुमारे ८.१० वाजता रवाना होणाऱ्या अलास्का एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक १३०६च्या बोर्डिंगदरम्यान घडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही अधिकारी एका व्यक्तीला जमिनीवर रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यावेळी परिसरात इतर प्रवासीही सामानासह उभे असल्याचे दिसते.
‘माझ्या मुलीला घेऊन जात आहेत’; महिलेचा अधिकाऱ्यांसमोर आक्रोश
व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला मोठ्याने ओरडताना ऐकू येते. ‘ते माझ्या मुलीला घेऊन जात आहेत. तिच्याकडे वर्क परमिट आहे,’ असे ती सांगताना दिसते. तसेच, ती अधिकाऱ्यांच्या पायांना धरून रडत विनवणी करत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. (US ICE Airport Arrest)
ICEच्या माहितीनुसार, कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांवर गरम कॉफी फेकल्याच्या आरोपावरून सोफिया हर्नांडेज मेजिया या आणखी एका प्रवाशालाही ताब्यात घेण्यात आले. तीदेखील मेक्सिकोची नागरिक असून, व्हिसाची मुदत संपल्यानंतरही अमेरिकेत राहत असल्याचा आरोप आहे. तिच्यावर संघीय अधिकाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप ठेवला जाऊ शकतो, असे ICEने म्हटले आहे. इतर काही प्रवाशांनीही अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा दावा यंत्रणेने केला आहे. संघीय अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे हा गुन्हा असल्याचेही ICEने स्पष्ट केले.
पूर्वसूचना न देता कारवाई केल्याबद्दल विमान कंपनीची चिंता
बोर्डिंग सुरू असताना कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आलेल्या या कारवाईबद्दल अलास्का एअरलाइन्सने चिंता व्यक्त केली आहे. या घटनेचा संबंधित कर्मचारी आणि प्रवाशांवर अत्यंत त्रासदायक परिणाम झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच, विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या पोर्ट ऑफ सिएटलसोबत मिळून कारवाईदरम्यान निर्धारित नियमांचे पालन झाले होते की नाही, याची तपासणी करण्यात येत असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले. (US ICE Airport Arrest)
वॉशिंग्टनच्या गव्हर्नरांकडून ICEवर टीका
वॉशिंग्टनचे गव्हर्नर बॉब फर्ग्युसन यांनी ICEच्या कारवाईच्या पद्धतीवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी या पद्धतीला ‘अमेरिकन मूल्यांच्या विरोधातील’ ठरवत ICE यंत्रणा बरखास्त करण्याची मागणी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना फर्ग्युसन म्हणाले, “हा व्हिडिओ भयावह आणि अंगावर काटा आणणारा आहे. आपल्याला अशी स्थलांतर अंमलबजावणी आणि सीमा सुरक्षा व्यवस्था हवी, जी प्रभावी, नैतिक आणि मानवी असेल. मात्र, ICE तसे नाही आणि ही यंत्रणा सुधारणांच्या पलीकडे गेली आहे.” (US ICE Airport Arrest)
कामगार संघटनांकडूनही कारवाईवर टीका
६ लाखांहून अधिक कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वॉशिंग्टन स्टेट लेबर कौन्सिलच्या अध्यक्षा एप्रिल सिम्स यांनीही या कारवाईवर टीका केली. गर्दीच्या प्रवासाच्या हंगामात विमानतळावरील कामकाजात अडथळा निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. (US ICE Airport Arrest)
त्या म्हणाल्या, “विमानतळावरील कर्मचारी आधीच मोठ्या तणावाचा सामना करत आहेत आणि प्रवासीही त्रस्त आहेत. अशा वेळी शांतता आणि विश्वास निर्माण करण्याऐवजी संघीय अधिकाऱ्यांनी भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण केले.”
ICEकडून कारवाईचे समर्थन
दरम्यान, ICEने आपल्या कारवाईचे समर्थन केले आहे. संघीय अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या किंवा त्यांच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे यंत्रणेने स्पष्ट केले. तसेच, आपल्या अधिकाऱ्यांवरील हल्ल्यांमध्ये १,६०० टक्के, वाहनांद्वारे होणाऱ्या हल्ल्यांमध्ये ३,३०० टक्के आणि जीवे मारण्याच्या धमक्यांमध्ये ८,००० टक्के वाढ झाल्याचा दावाही ICEने केला आहे. (US ICE Airport Arrest)