बहुआयामी आयुर्वेद प्रचारक, संस्कृतीचे अभ्यासक आणि साहित्यिक वैद्य विक्रांत जाधव यांच्या प्रेरणादायी प्रवासाविषयी...
‘आयुर्वेद’ हा भारतीय जीवनशैली, संस्कृती, परंपरा आणि ज्ञानाचा अमूल्य वारसा आहे. त्याचे जतन, संवर्धन आणि जागतिकस्तरावरील प्रसारणासाठी आयुष्य समर्पित करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच, वैद्य विक्रांत जाधव! आयुर्वेदाचे अभ्यासक, चिकित्सक, प्रभावी वक्ते, लेखक, संपादक, संशोधक आणि भारतीय संस्कृतीचे प्रचारक अशा विविध भूमिका ते समर्थपणे पार पाडतात. मुंबईत जन्मलेल्या विक्रांत यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले. इंग्रजी साहित्य आणि लेखनशैलीचा प्रभाव असतानाही, त्यांनी आयुर्वेद आणि संस्कृत परंपरेशी आपली नाळ घट्ट जोडली. नाशिकमध्ये शिक्षण घेतल्यावर, पुढे पुणे विद्यापीठाचीही पदवी प्राप्त केली. वैद्य करमरकरशास्त्री यांच्याकडून गुरुपरंपरेने आयुर्वेदाचे ज्ञान त्यांना मिळाले.
पुढे १९९२ मध्ये ‘आयुर्वेद चिकित्सापद्धती’चा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतानाच, आयुर्वेदाला समाजात किती प्रतिसाद मिळेल? याचा विचार न करता आपल्या ध्येयाचा प्रारंभ केला. या प्रवासात त्यांना पत्नी नीलिमा यांची मोलाची साथ लाभली.
आयुर्वेद सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा, शास्त्रीय माहिती लोकांना समजावी, या हेतूने त्यांनी नाशिकमध्ये सार्वजनिक व्याख्यानांची परंपरा सुरू केली. लंडनच्या ‘हाईड पार्क’च्या धर्तीवरच, नाशिकच्या चौकाचौकांत आयुर्वेदाची माहिती देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. विविध उपचारपद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव लोकांना मिळावा, म्हणून मोफत शिबिरांचेही आयोजन त्यांनी केले. ‘भगवान धन्वंतरी’ यांची जयंती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी, गुरूंच्या आशीर्वादाने धन्वंतरी जयंती उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. गेली ३५ वर्षे हा उपक्रम अव्याहतपणे सुरु आहे.
भारतातून आयुर्वेदविषयक पहिले संकेतस्थळ सुरू करण्याचा ध्यासही त्यांनी घेतला. त्याकाळात नाशिकमध्ये इंटरनेटची सुविधा सहज उपलब्ध नव्हती. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय आयुर्वेदाची माहिती जगभर पोहोचविता येईल, या विश्वासातूनच त्यांनी हा प्रयोग केला. अल्पावधीतच ३८ देशांमधून प्रतिसाद मिळाला. भारतीय चिकित्सा परंपरेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या दिशेने टाकलेले, हे महत्त्वाचे पाऊल ठरले. आयुर्वेद केवळ पुस्तकांमध्ये किंवा व्याख्यानांमध्ये न राहता, लोकांना प्रत्यक्ष समजून घेता यावा, या विचारातूनच नाशिकमध्ये आयुर्वेदाचे पहिले प्रदर्शनही त्यांनीच आयोजित केले. या प्रदर्शनात आयुर्वेदातील औषधनिर्मिती प्रक्रिया, औषधी वनस्पती आणि विविध पारंपरिक चिकित्सापद्धतींची माहिती देण्यात आली. विशेष आकर्षण ठरले, ते ‘सुवर्णभस्म’निर्मितीचे प्रात्यक्षिक! नाशिकच्या मैदानात प्रत्यक्ष भट्टी उभारून ‘सुवर्णभस्म’निर्मितीची प्रक्रिया दाखविण्यात आली. पाच दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद मिळाला.
नंतर मुंबईतील ‘हर्बल विश्व’ या प्रदर्शनासाठीही त्यांना आमंत्रित करण्यात आले. प्रबोधन संस्थेच्या माध्यमातून सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून आयोजित या प्रदर्शनात ३६० औषधी वनस्पतींची माहिती, आयुर्वेदविषयक व्याख्याने आणि भारतीय आहारपद्धतीची प्रात्यक्षिके सादर झाली. आयुर्वेदाच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याची संधी त्यांना दुबई येथे लाभली. आयुर्वेदाला समर्पित ‘धूतपापेश्वर’ संस्थेचे रणजित पुराणिक यांच्या सहकार्याने, हा नवा अध्याय सुरू झाला. दुबई येथे आयोजित आयुर्वेदविषयक चार दिवसांच्या परिसंवादात त्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर श्रीलंका आणि दक्षिण-पूर्व आशियातील विविध देशांमध्ये, आयुर्वेदाच्या विविध पैलूंच्या प्रचाराची संधीही मिळाली. २००८ मध्ये अमेरिकेच्या लास वेगास येथे, वनस्पतिजन्य औषधांशीसंबंधित आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातही ते सहभागी झाले होते. तेथूनच आयुर्वेदाची जागतिकस्तरावर ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नांना नवे बळ मिळाले.
आजवर विविध वाहिन्यांवर १००हून अधिक कार्यक्रम, मुलाखती आणि थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेद, आरोग्य, भारतीय आहारपद्धती आणि संस्कृतीविषयी जनजागृती केली आहे. काश्मीरमधील ‘ट्युलिप’ फुलांपासून ते अंटार्क्टिका प्रदेशातील फुलणार्या वनस्पतींपर्यंत, विविध वनस्पतींचा अभ्यास आणि त्यांचे संदर्भ लेखनातून मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. वनस्पती, त्यांचे गुणधर्म आणि मानवी आरोग्यातील संबंध समजून घेण्याची त्यांची जिज्ञासा, त्यांच्या लेखनातून जाणवते. २००७ मध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गजर्वाडी येथे आयुर्वेदाच्या माध्यमातून, कुपोषण निर्मूलनाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून आयुर्वेदिक औषधोपचार आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून कुपोषणवर काम करण्यात आले. या उपक्रमाचा अहवाल विभागीय आयुक्तांनाही सादर करण्यात आला. या कामाची पाहणी करण्यासाठी ‘युनिसेफ’च्या अधिकारी मीरा नायर यांनी, विशेषतः दिल्लीहून भेट दिल्याचा उल्लेखही त्यांच्या कार्यप्रवासात महत्त्वाचा आहे. आयुर्वेदाला समर्पित वैद्य विक्रांत जाधव यांना, पुढील कार्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!