मुंबई, (Mumbai Police Digital Policing): मुंबई पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ करून नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि प्रभावी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत आहे. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या विविध तंत्रज्ञानाधारित सुविधांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. स्मार्ट कार्ड, टॅब्लेट वितरण, मुंबई पोलीस एकात्मिक कार्यप्रणाली, सिटीझन ॲप तसेच अत्याधुनिक अँटी-नार्कोटिक्स तपास वाहन अशा सुविधांमुळे मुंबई पोलिसांच्या कामकाजाला डिजिटल बळ मिळणार आहे.
पोलीस दलाच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे निष्पक्षता, गतिमानता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्यास मदत होणार आहे. दैनंदिन कामकाज अधिक सुलभ करून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासोबतच नागरिकांना जलद सेवा देण्याच्या उद्देशाने या सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत.(Mumbai Police Digital Policing)
या कार्यक्रमाला कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मुंबई पोलीस दलाच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीचे कौतुक केले. 'नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र' अभियानांतर्गत अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने 'तपास सारथी' प्रणाली विकसित करण्यात येत असून, एफआयआरपासून चार्जशीट, पुरावे व्यवस्थापन आणि तपासाच्या विविध टप्प्यांना एकाच डिजिटल प्रणालीत जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.(Mumbai Police Digital Policing)
नवीन कायद्यांनुसार डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांना महत्त्व प्राप्त झाल्याने 'हॅश व्हॅल्यू'च्या आधारे पुराव्यांची सुरक्षितता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करत संपूर्ण तपास प्रक्रिया 'एंड-टू-एंड डिजिटल' करण्यावर भर दिला जात आहे. सीसीटीव्ही, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, डेटा डिक्रिप्शन आणि सोशल मीडिया विश्लेषण यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुन्हे प्रतिबंध आणि तपास अधिक प्रभावी करण्यासाठी मुंबई पोलीस दल डिजिटल पोलिसिंगच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या फॉरेन्सिक तपास वाहनाला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले. आधुनिक तपास उपकरणांनी सज्ज असलेल्या या वाहनामुळे अंमली पदार्थविरोधी कारवाईदरम्यान तपास प्रक्रिया अधिक गतिमान आणि परिणामकारक होण्यास मदत होणार आहे.(Mumbai Police Digital Policing)
✅ डिजी आयडी स्मार्ट कार्ड : मुंबई पोलिसांची अधिकृत ओळख दर्शविणारे स्मार्ट ओळखपत्र.
✅ स्मार्ट टॅब्लेट्स : पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामकाज अधिक जलद आणि कार्यक्षम करण्यासाठी टॅब्लेट सुविधा.
✅ अँटी-नार्कोटिक्स फॉरेन्सिक व्हॅन : अंमली पदार्थविरोधी कारवाई आणि तपासासाठी अत्याधुनिक वाहन.
✅ मुंबई पोलीस माहिती प्रणाली (MPIS) व संवाद ॲप : पोलीस कामकाज, समन्वय आणि माहिती व्यवस्थापन अधिक सुलभ करण्यासाठी डिजिटल प्रणाली.
✅ मुंबई पोलीस सिटीझन ॲप : नागरिकांना पोलीस सेवा व सुविधांचा डिजिटल माध्यमातून सहज लाभ घेण्यासाठी ॲप.
✅ प्रत्यंचा – मुंबई पोलीस फ्युजन सेंटर : विविध स्रोतांतील माहितीचे विश्लेषण करून प्रतिबंधात्मक आणि प्रेडिक्टिव्ह पोलिसिंग अधिक प्रभावी करण्यासाठी केंद्र.