
ठाणे (MP Kridasangram Season 2):खेळाडूंचे संचलन, ट्रॉफीचे अनावरण, आंतरराष्ट्रीय पदकविजेत्यांचा सन्मान आणि कुस्तीच्या आखाड्यातील थरार अशा उत्साहपूर्ण वातावरणात खासदार क्रीडासंग्राम सीझन २ चा शुक्रवारी दिमाखात शुभारंभ झाला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित या स्पर्धेत यंदा ७५ हजारांहून अधिक खेळाडूंच्या सहभागाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघांतील ३५ हून अधिक क्रीडास्थळांवर २० ते २९ नोव्हेंबरदरम्यान ३२ विविध क्रीडाप्रकारांच्या स्पर्धा रंगणार आहेत. कबड्डी, खो-खो, कुस्ती, मल्लखांब यांसारख्या पारंपरिक खेळांसह बॅडमिंटन, फुटबॉल, जलतरण, अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, बुद्धिबळ आदी आधुनिक खेळांचाही समावेश आहे.(MP Kridasangram Season 2)
उद्घाटन सोहळ्यात पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेते प्रणव देसाई आणि युवा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती शौर्या अंबुरे यांचा सन्मान करण्यात आला. अभिनेत्री निम्रत कौर यांची उपस्थिती, पोवाड्याचे सादरीकरण आणि कुस्तीच्या सामन्यांनी सोहळ्याची रंगत वाढवली.
लहान शहरांतील गुणवंत खेळाडूंनाही मोठे व्यासपीठ मिळावे, हा क्रीडासंग्रामचा उद्देश आहे. या स्पर्धेतून पुढे येणाऱ्या खेळाडूंना जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. डोंबिवलीतील देशातील पहिले व्हर्टिकल क्रीडा संकुल, कळव्यातील क्रीडा संकुल तसेच अंबरनाथ, कल्याण आणि उल्हासनगरमधील क्रीडा सुविधांच्या विकासाचाही त्यांनी उल्लेख केला.(MP Kridasangram Season 2)
यावेळी मंत्री दादा भुसे, उदय सामंत, प्रताप सरनाईक, आमदार डॉ. बालाजी किणीकर, राजेश मोरे, सुलभा गायकवाड, रवींद्र फाटक, कुमार आयलानी यांच्यासह ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरच्या महापौर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.