विठुरायाच्या चरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे साकडे; पंढरपूरच्या विकासाचा संकल्प!

दर्शन मंडपासाठी अतिरिक्त २५ कोटी

    21-Nov-2026
 

Eknath Shinde Pandharpur Visit 
 
पंढरपूर (Eknath Shinde Pandharpur Visit): टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि लाखो वारकऱ्यांच्या भक्तिमय वातावरणात कार्तिकी एकादशीचा सोहळा शनिवारी पंढरपुरात उत्साहात पार पडला. या पावन पर्वावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नी लता शिंदे यांच्यासह श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी राज्यातील शेतकरी सुखी-समृद्ध व्हावा, बळीराजावरील संकट दूर व्हावे आणि महाराष्ट्रावर सुख-समृद्धी नांदावी, असे साकडे त्यांनी विठुरायाच्या चरणी घातले. त्याचवेळी पंढरपूरचा विकास करताना पर्यावरणाचे संरक्षण आणि स्थानिक नागरिकांचे हित जपले जाईल, अशी ग्वाही देत तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
 
या शासकीय महापूजेसाठी नांदेड जिल्ह्यातील उंचेगाव येथील शेतकरी दाम्पत्य सुधाकर आणि प्रणिता शिंदे यांना मानाचे वारकरी म्हणून सहभागी होण्याचा सन्मान मिळाला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, त्यांच्या पत्नी वृषाली आणि पुत्र रुद्रांश हेदेखील यावेळी उपस्थित होते. महापूजेनंतर शिंदे यांनी राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांना कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. (Eknath Shinde Pandharpur Visit)
 
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करताना शेतकरी हा सरकारच्या दृष्टीने सर्वोच्च प्राधान्याचा घटक असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे. शेतकऱ्यांना संकटात वाऱ्यावर सोडणार नाही. दुष्काळग्रस्तांना अग्रिम मदत, पीक नुकसानभरपाई, विद्यार्थ्यांच्या शुल्कात सवलत आणि कर्जवसुलीला स्थगिती यांसह आवश्यक उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. जनावरांसाठी चारा, पिण्याचे पाणी आणि अन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Eknath Shinde Pandharpur Visit)
 
स्थानिकांना विश्वासात घेऊनच कॉरिडॉर : 
 
पंढरपूरच्या विकासाबाबत बोलताना दर्शनव्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य आणि पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर भर दिला जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पंढरपूर कॉरिडॉरच्या उभारणीत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतले जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही, प्रत्येकाला न्याय मिळेल आणि पर्यावरणाचे संरक्षण करूनच विकासाची प्रक्रिया पुढे नेली जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. विकास हा लोकांसाठी असतो, त्यामुळे लोकांचा विश्वास संपादन करणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. (Eknath Shinde Pandharpur Visit)
 
दर्शन मंडपासाठी आणखी २५ कोटी:
 
तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपुरात दर्शन मंडप, स्कायवॉक आणि टोकन पद्धतीची दर्शनरांग उभारण्यासाठी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी १२९ कोटींचा निधी मंजूर केला होता. या कामाची पाहणी केल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानुसार पर्यटन विभागाच्या माध्यमातून आणखी २५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची घोषणा शिंदे यांनी केली. तसेच मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या पदांना मंजुरी आणि त्यांच्या घरांचा प्रश्न सोडविण्याबाबतही त्यांनी सकारात्मक आश्वासन दिले. (Eknath Shinde Pandharpur Visit)
 
पर्यावरणपूरक वारीसाठी सर्वांचे अभिनंदन:
 
कार्तिकी यात्रेसाठी दाखल झालेल्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन, मंदिर समिती, पोलीस यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या नियोजनाचे शिंदे यांनी कौतुक केले. स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थेसोबतच पर्यावरणपूरक वारीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या उपक्रमांचेही त्यांनी अभिनंदन केले. जलयुक्त शिवार, पाणी अडवा-पाणी जिरवा आणि जलतारा यांसारख्या उपक्रमांतून जलसंधारणाला चालना देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
 
यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री भरतशेठ गोगावले, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.(Eknath Shinde Pandharpur Visit)
  
 




संबंधित मजकूर