मुंबई (Shaina NC Apology) : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याप्रकरणी शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाचा निषेध नोंदवत असतानाच शायना एनसी यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेला. त्यामुळे राज्यभरात गदारोळ उडाला असून सर्वत्र या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. (Shaina NC Apology)
त्यानंतर शायना एनसी यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत या प्रकाराबद्दल माफी मागितली. त्या म्हणाल्या की, "काही माणसे आणि काही नाती आयुष्यभर काळजाच्या एका कोपऱ्यात घर करून राहतात. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझ्या आयुष्यातील असेच पितृतुल्य आणि देवतुल्य व्यक्तिमत्त्व. मी लहान असताना पहिल्यांदा बाळासाहेबांना भेटले. ते माझ्या वडिलांचे अत्यंत जिवलग मित्र होते. आमच्या कुटुंबाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक वर्षे त्यांचा अखंड सहवास आम्हाला लाभला, आशीर्वाद मिळाले." (Shaina NC Apology)
"बाळासाहेब हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे एक अद्वितीय आणि तेजस्वी नेतृत्व होते. प्रखर देशभक्त, कट्टर आणि अभिमानी हिंदू, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निस्सीम चाहते. हिंदुत्वाच्या विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. काँग्रेसच्या विचारधारेविरोधात त्यांनी कायम ठाम आणि निर्भीड भूमिका घेतली. त्यांच्या विचारांमधील स्पष्टता, रोखठोकपणा आणि धगधगते तेज मला नेहमीच प्रेरणा देत आले आहे," असे त्या म्हणाल्या. (Shaina NC Apology)
माझ्या कृतीचा विपर्यास
"कालच्या पत्रकार परिषदेत मी बाळासाहेबांच्या विचारांचा संदर्भ दिला. मात्र, माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. माझा हेतू बाळासाहेबांचा अनादर करण्याचा कधीच नव्हता. उलट, त्यांनी आयुष्यभर जपलेल्या ज्वलंत विचारांमधूनच मी प्रेरणा घेते. बाळासाहेबांविषयी तमाम जनतेच्या मनात असलेली श्रद्धा आणि प्रेम मला पूर्णपणे समजते. माझ्यासाठी आणि कोट्यवधी लोकांसाठी बाळासाहेब हे केवळ एक नेते नव्हते, तर दैवत होते. माझ्या कृतीमुळे जर खऱ्या शिवसैनिकांच्या किंवा बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील, तर मी मनापासून त्यांची माफी मागते. पण, ज्यांनी माझ्या या कृतीचा विपर्यास करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मला ठणकावून सांगायचे आहे की, बाळासाहेबांवरचे माझे प्रेम आणि निष्ठा सिद्ध करण्यासाठी मला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही," असेही त्या म्हणाल्या. (Shaina NC Apology)
उबाठा गटाचे आंदोलन
दरम्यान, शायना एनसी यांच्या विरोधात उबाठा गटाकडून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. आंदोलकांनी शायना एनसी यांच्या फोटोला काळे फासले तसेच त्यांचा फोटोही जाळला. शायना एनसी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. (Shaina NC Apology)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....