
मुंबई (Ranjit Savarkar Warning on Nehru) : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांच्या ‘बिलॉन्गिंग: ए जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केला आहे. भविष्यात काँग्रेस नेत्यांनी सावरकरांविषयी खोटी माहिती दिल्यास पंडित जवाहरलाल नेहरू यांची काळीकृत्ये जनतेसमोर मांडायला आपण घाबरणार नाही, असा थेट इशाराही त्यांनी दिला
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि सावरकरप्रेमी अनिल त्रिवेदी उपस्थित होते.(Ranjit Savarkar Warning on Nehru)
पत्रकार परिषदेत बोलताना रणजित सावरकर यांनी नेहरूंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, "१० मे १९४७ रोजी जी फाळणीची योजना नेहरूंनी नाकारली होती, तीच योजना लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या संपर्कानंतर त्यांनी संमत केली. नाकारलेली योजना नेहरूंनी नेमकी कशामुळे संमत केली, याचा उल्लेख सोनिया गांधींनी आपल्या आत्मचरित्रात केलेला नाही. लेडी माऊंटबॅटन यांच्या आहारी जाऊन नेहरूंनी देशवासीयांवर फाळणी लादली आणि यानंतर झालेल्या दंगलींमध्ये २० लाखांहून अधिक हिंदू मारले गेले."
नेहरूंच्या आत्मचरित्रावर आणि पत्रव्यवहारावर भाष्य करताना रणजित सावरकर म्हणाले, नेहरू यांनी केवळ १९३४ पर्यंतचेच आत्मचरित्र लिहिले. त्यापुढील काळात स्वातंत्र्यलढ्यात योगदान न देता मौजमजा करत असल्याची जाणीव किंवा शल्य वाटत असल्याने त्यांनी पुढच्या जीवनाचा उल्लेख टाळला असावा, अशी टीका त्यांनी केली.(Ranjit Savarkar Warning on Nehru)
पुढे ते म्हणाले, नेहरू पंतप्रधान असताना लेडी माऊंटबॅटन यांना नियमित पत्रे पाठवून दिवसभरातील कामाची माहिती आणि प्रेमाचे प्रदर्शन करत असत, असा उल्लेख लॉर्ड माऊंटबॅटन यांची कन्या पामेला माऊंटबॅटन हिने आपल्या पुस्तकात केला आहे. दिल्लीतील 'नेहरू संग्रहालयात' उपलब्ध असलेली ही पत्रे सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्यानंतर गायब करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
मला नेहरूंच्या वैयक्तिक चारित्र्याविषयी बोलायचे नाही; परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी सुरूच ठेवली, तर नेहरूंचे सत्य बाहेर काढण्यास मी मागेपुढे पाहणार नाही," असेही रणजित सावरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.(Ranjit Savarkar Warning on Nehru)