पालघर नवली परिसरात तिसरा बिबट्या जेरबंद

    20-Nov-2026

Palghar Leopard Rescue
 
पालघर: (Palghar Leopard Rescue)पालघर तालुक्यातील नवली येथील बोगुलीपाडा भागात आज (शुक्रवार, २० नोव्हेंबर) सकाळी एक बिबट्या जाळ्यात अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वन विभाग आणि 'वाइल्ड लाईफ कंजरवेशन अँड ॲनिमल वेल्फेअर' या प्राणीमित्र संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे ही कारवाई यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
 
मागील काही दिवसांपासून पालघर आणि डहाणू परिसरात बिबट्याचा वावर आणि हल्ल्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. पालघरमधील नवली परिसरात एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर डहाणू तालुक्यातील माटगाव भागातही एका महिलेवर हल्ला झाल्याची नोंद झाली. या सलग घटनांमुळे बिबट्याला जेरबंद करणे हे वन विभाग आणि प्राणीमित्रांसमोर मोठे आव्हान बनले होते.(Palghar Leopard Rescue)
 
नवली येथील हल्ल्यानंतर वन विभागाने तातडीने पावले उचलत परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले होते आणि बिबट्याला पकडण्यासाठी जाळी लावली होती. तसेच माटगाव भागातही बिबट्याच्या बंदोबस्तासाठी जाळे लावण्यात आले होते. त्यानुसार ११ नोव्हेंबर रोजी माटगाव येथे एक बिबट्या जेरबंद करण्यात यश आले होते. त्यापूर्वी बावडा येथेही एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते; मात्र तांत्रिक कारणांमुळे ही माहिती वन विभागाने गोपनीय ठेवली होती. अखेर आज नवलीच्या बोगुलीपाडा भागात आणखी एक बिबट्या जाळ्यात अडकला आहे.
 
आज पकडलेला बिबट्या नरभक्षक असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे बोलले जात आहे. एकूणच, पालघरच्या किनारपट्टी भागात गेल्या दोन महिन्यांत तीन बिबट्यांना सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आले आहे. यापैकी दोन बिबट्यांना संरक्षित वनक्षेत्रात हलवण्यात आले असून, आज जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याला पुढील कार्यवाहीसाठी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. या मोहिमेत वन विभागासोबत 'वाइल्ड लाईफ कंजरवेशन अँड ॲनिमल वेल्फेअर' संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. आता पुढील तपासणी आणि वन विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Palghar Leopard Rescue)
 




संबंधित मजकूर