नवी दिल्ली (Mohammed Siraj Selection Controversy) : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला स्थान न मिळाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. सिराजच्या निवडीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसचे खासदार इमरान मसूद यांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भेदभावाचा आरोप केला आहे. तर भाजपने त्यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेत खासदारांचे वक्तव्य 'लज्जास्पद' असल्याचे म्हटले आहे.
'सिराज नावामुळे संघात स्थान मिळाले नाही'; इमरान मसूदांचा आरोप
काँग्रेस खासदार इमरान मसूद यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सिराजच्या निवडीबाबत नाराजी व्यक्त केली. चांगली कामगिरी करूनही सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नाही. त्याच्या नावामुळेच त्याला संघात घेतले नसावे, असा आरोप मसूद यांनी केला. कामगिरी चांगली असूनही खेळाडूला संधी न देणे हा स्पष्टपणे भेदभाव असल्याचेही त्यांनी म्हटले. (Mohammed Siraj Selection Controversy)
भाजपचा काँग्रेसवर पलटवार
मसूद यांच्या आरोपांवर भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी पलटवार केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील पोस्टमध्ये त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका करत म्हणाले, "काँग्रेस पक्षाला लाज वाटली पाहिजे. काँग्रेस पक्ष आता क्रिकेट संघाच्या निवडीतही व्होट-बँकचे राजकारण करत आहे." (Mohammed Siraj Selection Controversy)
'सिराज मुस्लिम असल्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले,' असे काँग्रेसचे म्हणणे आहे. मात्र, रवींद्र जडेजालाही संघात स्थान देण्यात आलेले नाही. भारतीय संघाची जर्सी परिधान करणारा प्रत्येक खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करतो. वोट-बैंक आणि सांप्रदायिक राजकारणासाठी भारतीय क्रिकेट संघात फूट पाडणे थांबवा, असे भंडारी यांनी म्हटले. (Mohammed Siraj Selection Controversy)
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न दिल्याने क्रिकेट क्षेत्रातील माजी खेळाडूंनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी या निर्णयाला आश्चर्यकारक म्हटले, तर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सिराजचा अनुभव, आक्रमकता आणि वेगवान गोलंदाजीतील कौशल्याचा विचार व्हायला हवा होता, असे मत व्यक्त केले.
दरम्यान, सिराजला संघात स्थान न देण्यामागील कारणांबाबत भारतीय संघ व्यवस्थापनाने निवड ही सामन्याच्या परिस्थिती आणि संपूर्ण सामन्याचा विचार करून केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे एका खेळाडूच्या निवडीवरून सुरू झालेल्या वादाला आता राजकीय वळण लागले आहे. (Mohammed Siraj Selection Controversy)