मुंबई : (Ritu Tawde Diya Mirza Controversy)अभिनेत्री दिया मिर्झा या सातत्याने भाजप आणि हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका मांडत असल्याचा आरोप करत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी त्यांच्यावर टीका केली. हिंदू सण कसे साजरे करावेत, याबाबत दिया मिर्झा यांनी आम्हाला शिकवू नये. दिवाळी कशी साजरी करावी, हे सांगण्याचे धाडस त्यांनी करू नये, असे रितू तावडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
दिवाळीतील फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर दिया मिर्झा यांनी केलेल्या व्हिडिओला विरोध दर्शवत त्यांना १०० टक्के ब्लॅकलिस्ट केल्याचा दावाही रितू तावडे यांनी केला. हिंदू धर्माबाबत कोणी आक्षेपार्ह भूमिका मांडल्यास आम्हीही त्याला प्रत्युत्तर देऊ, असे त्या म्हणाल्या.(Ritu Tawde Diya Mirza Controversy)
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रदूषणाबाबत सेलिब्रिटींचे व्हिडिओ घेण्याच्या सूचना होत्या. मात्र, प्रशासनाने सेलिब्रिटींची यादी आम्हाला दाखवली नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. नर्मदा प्रकल्पाला आणि गुजरातमधील जनतेच्या पाणी व शेतीच्या प्रश्नांना दिया मिर्झा यांनी विरोध केल्याचा आरोपही रितू तावडे यांनी केला.
दरम्यान, भाजप नेते अमित साटम यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट ही भाजपचीच भूमिका असल्याचे रितू तावडे यांनी सांगितले. तसेच, मुंबई महापालिकेच्या पोर्टलवर कोणती माहिती प्रसिद्ध होणार, याचा निर्णय महापौर म्हणून आपण घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.(Ritu Tawde Diya Mirza Controversy)