
जयपुर : (Rajasthan 8 Workers Electrocuted)राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यात रस्ते बांधकाम सुरू असताना भीषण दुर्घटना घडली आहे. छापोली गावात कदम कुंडकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असताना खडी मिश्रण करणारी मशीन वरून जाणाऱ्या ११ हजार व्होल्टच्या विजेचा संपर्कात आली. त्यामुळे मशीनमध्ये विजेचा प्रवाह उतरून काम करणाऱ्या मजुरांना जोरदार विजेचा धक्का बसला. या दुर्घटनेत आठ मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, छापोली गावातून कदम कुंडकडे जाणाऱ्या मार्गावर रस्ते बांधकामाचे काम सुरू होते. या कामासाठी खडी मिश्रण करणारी मशीन वापरण्यात येत होती. मजूर नेहमीप्रमाणे बांधकामाच्या कामात व्यस्त असताना अचानक ही मशीन ११ हजार व्होल्टच्या विजेचा च्या संपर्कात आली. त्यामुळे मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह उतरला आणि तिच्या संपर्कात आलेले मजूर विजेच्या धक्क्याने गंभीररीत्या भाजले, ही दुर्घटना इतकी भीषण होती की, आठ मजुरांना घटनास्थळीच जीव गमवावा लागला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(Rajasthan 8 Workers Electrocuted)
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाल्याने घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. एकाच वेळी आठ मजुरांचा मृत्यू झाल्याने छापोली गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, बांधकाम सुरू असताना मशीनचा वापर कसा करण्यात आला आणि कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, असे गंभीर प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित होत आहेत. या अपघातामुळे बांधकामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.(Rajasthan 8 Workers Electrocuted)