कल्याण : (KDMC Dry Waste Collection Drive)केडीएमसी तर्फे राबविण्यात आलेल्या सुका कचरा संकलन मोहिमेस नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेच्या महापौर ॲड. हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांचे निर्देशानुसार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक महिन्याचा " पहिला रविवार -सुका कचरा "ही मोहीम राबविली जाते. यासाठी महापालिका क्षेत्रातील विविध २५ ठिकाणी सुक्या कचऱ्यातील पुनर्वापरायोग्य घटक स्वतंत्रपणे जमा करण्यासाठी, विशेष कचरा संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत. महापालिकेच्या या संकलन केंद्रावर राबविण्यात येणाऱ्या सुका कचरा संकलन मोहिमेत रविवारी जवळपास ७०० नागरिकांनी विविध २५ ठिकाणावर प्लास्टिक, कापड,काच, इ वेस्ट, थर्माकोल फर्निचर इत्यादी घटक संकलित केले.डोंबिवली येथील गणेश मंदिर, महापालिकेचे विभागीय कार्यालय, टिळकनगर ,रोटरी भवन येथे नागरिकांनी महिनाभर संकलित केलेला प्लास्टिक,इ वेस्ट, कापड,थर्माकोल,काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या संकलित करून, हस्तांतरित करण्यासाठी उस्फुर्त सहभाग नोंदविला.(KDMC Dry Waste Collection Drive)
कचरा वापरा आणि फेका ऐवजी वापरा, साठवा आणि हस्तांतरित करा या पद्धतीने कचरा व्यवस्थापनामध्ये नवीन दृष्टिकोन निर्माण होत असल्याबाबत आयुक्त गोयल यांनी संकलन केंद्रांच्या भेटीदरम्यान समाधान व्यक्त केले व ऊर्जा फाऊंडेशन,टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,रोटरी क्लब,निर्मल फाऊडेशन या संस्था प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी संकलन मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे त्यांचे समवेत होते.(KDMC Dry Waste Collection Drive)