दिया मिर्झाच्या प्रदूषमुक्त दिवाळी संदेशामुळे राजकीय फटाके! अमित साटम यांच्या आक्षेपानंतर बीएमसीकडून व्हिडीओ हटवला; महापौर रितू तावडेंकडून अभिनेत्री ब्लॅकलिस्टमध्ये

 
Dia Mirza BMC Diwali Video Controversy
 
मुंबई (Dia Mirza BMC Diwali Video Controversy) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या (बीएमसी) जनसंपर्क विभागाकडून सोशल मीडिया हँडलवर अभिनेत्री दिया मिर्झाचा प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करणारा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला होता. मात्र, या व्हिडीओवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला.
 
भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी या मोहिमेवर आक्षेप घेतल्यानंतर महापालिकेने दिया मिर्झाचा व्हिडीओ सोशल मीडिया पेजवरून हटवला. त्यानंतर राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे आणि इतर भाजप नेत्यांनी यावरून मुंबई महानगरपालिकेला लक्ष केले. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही दिया मिर्झाच्या भूमिकेवर टीका केली. तसेच, यापुढे माय बीएमसी हँडलवर जाणाऱ्या सर्व मजकुरावर बारकाईने लक्ष ठेवले जाणार असल्याबाबत माहिती दिली. (Dia Mirza BMC Diwali Video Controversy)
 
नेमका वाद काय?
 
दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणारे वायुप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी बीएमसीकडून जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दिया मिर्झासह अभिनेत्री माधुरी दीक्षित, निशिगंधा वाड आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांचे व्हिडीओ तयार करण्यात आले होते. दिया मिर्झाने आपल्या व्हिडीओत फटाके टाळण्याचे आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. (Dia Mirza BMC Diwali Video Controversy)
 
मात्र, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी या व्हिडीओवर नाराजी व्यक्त केली. समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, 'दिवाळी कशी साजरी करावी, याचे धडे आम्हाला दिया मिर्झाकडून घेण्याची गरज नाही. आमच्या परंपरा आणि संस्कृती खोलवर रुजलेल्या आहेत,' अशी भूमिका मांडली. त्यांनी बीएमसीलाही या पोस्टमध्ये टॅग केले होते. त्यानंतर महापालिकेने दिया मिर्झाचा व्हिडीओ हटवला.
 
मंत्री नितेश राणेंचीही अभिनेत्रीवर टीका
 
या वादात मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनीही उडी घेतली. दिया मिर्झा यांच्यावर सनातन हिंदू धर्मविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करत त्यांनी टीका केली. पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा सल्ला केवळ हिंदूंच्या सणांपुरताच का दिला जातो?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ईद, मोहरम आणि बकरीदच्या वेळीही पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्याबाबत जनजागृती केली पाहिजे, असे ते म्हणाले. या विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Dia Mirza BMC Diwali Video Controversy)

'दिया मिर्झाला ब्लॅकलिस्ट केले'
 
या प्रकरणावर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही आक्रमक भूमिका घेतली. दिवाळी हा हिंदूंचा सण असून, तो कसा साजरा करायचा हे दिया मिर्झाने शिकवण्याची गरज नाही, असे त्या म्हणाल्या. दिया मिर्झा यांच्याकडून यापूर्वीही हिंदू संस्कृती आणि हिंदू सणांविषयी आक्षेपार्ह भूमिका घेतली गेल्याचा आरोप त्यांनी केला. नर्मदा प्रकल्पाच्या विरोधातील भूमिकेचाही त्यांनी उल्लेख केला.
 
महापौर म्हणाल्या की, प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी कलाकारांचे सहकार्य आवश्यक आहे. मात्र, व्हिडीओसाठी कलाकारांची निवड करताना संबंधित यादी लोकप्रतिनिधींना दाखवण्यात आली नाही. ही यादी आधी दाखवली असती, तर दिया मिर्झाचे नाव वगळण्यास सांगितले असते. यापुढे अशा व्यक्तींना महापालिकेच्या जनजागृती मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार नाही. दिया मिर्झाला ब्लॅकलिस्ट करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. (Dia Mirza BMC Diwali Video Controversy)





गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर