नवी दिल्ली (Modi GTA Gaming Development Post) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १३ वर्षांत भारताने साधलेल्या प्रगतीचा लेखाजोखा चक्क GTA 6 स्टाईलमध्ये मांडला आहे. गेमिंगच्या भन्नाट अंदाजात सादर केलेली भारताच्या विकासाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली. यामध्ये GTA 5 आणि आगामी GTA 6 या गेमच्या संदर्भातून २०१३ पासून आतापर्यंत भारतात झालेल्या विविध विकासात्मक बदलांची झलक दाखवण्यात आली आहे. गेमिंगच्या लोकप्रिय शैलीचा वापर करून भारताच्या प्रगतीचे चित्र मांडण्याचा हा अनोखा प्रयत्न लक्ष वेधून घेत आहे.
‘GTA’ स्टाईल पोस्टमधून काँग्रेसवर निशाणा?
या पोस्टसोबत ‘भारत आता एक वेगळाच गेम खेळत आहे’ (India is playing a whole new game) असे कॅप्शन देण्यात आले आहे. पोस्टमधील स्लाइड्सच्या माध्यमातून देशाने गेल्या दशकभरात मिळवलेल्या विविध उपलब्धी मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये गरिबीमध्ये झालेली मोठी घट आणि भारताच्या आर्थिक प्रगतीचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टमधून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तत्कालीन यूपीए सरकारच्या कार्यकाळावर अप्रत्यक्ष टीका करण्यात आली आहे. (Modi GTA Gaming Development Post)
GTA गेमची ओळख असलेल्या 'प्राइसडाउन' फॉन्टचा वापर
या पोस्टमधील स्लाइड्समध्ये GTA गेमची खास ओळख असलेल्या 'प्राइसडाउन' फॉन्टचा वापर करण्यात आला आहे. ठळक, गडद आणि लक्षवेधी अक्षरशैली ही GTA गेमच्या पोस्टर्स आणि ग्राफिक्सचे वैशिष्ट्य आहे. याच शैलीचा वापर करून भारताच्या विकासाची आकडेवारी आणि विविध उपलब्धी प्रभावीपणे सादर करण्यात आल्या आहेत.
पोस्टमध्ये भारताने 'फ्रॅजाइल फाइव्ह' या अर्थव्यवस्थांच्या गटातून बाहेर पडून वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ऑगस्ट २०१३ मध्ये मॉर्गन स्टॅन्लीच्या एका विश्लेषकाने भारत, ब्राझील, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका आणि तुर्की या पाच अर्थव्यवस्थांना 'फ्रॅजाइल फाइव्ह' असे संबोधले होते. या देशांच्या अर्थव्यवस्था परदेशी भांडवलाच्या प्रवाहावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याने जागतिक आर्थिक परिस्थितीतील बदलांचा त्यांच्यावर परिणाम होण्याची शक्यता अधिक होती. मात्र, भारत आता या गटातून बाहेर पडल्याचे पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. (Modi GTA Gaming Development Post)
गेमिंग समुदायाशी जोडण्याचा प्रयत्न
भारताच्या विकासाशी संबंधित अन्य उपलब्धींमध्ये स्वच्छता अभियानाची पूर्तता, सौरऊर्जा निर्मिती क्षमतेत झालेली मोठी वाढ, अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातील ४४० नोंदणीकृत स्टार्टअप्स आणि देशातील विद्युतीकरणातील प्रगती यांचा समावेश आहे.
तरुणाई आणि गेमिंग समुदायाशी जोडण्याच्या उद्देशाने पोस्टमध्ये इंटरनेटच्या किमतीतील घसरणीचाही उल्लेख करण्यात आला आहे. भारतात हाय-स्पीड इंटरनेटचा दर २०१३ मध्ये प्रति जीबी ३०८ रुपये होता, तो आता ७.५१ रुपये प्रति जीबीपर्यंत कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. (Modi GTA Gaming Development Post)
पंतप्रधान मोदी यांच्या पोस्टमध्ये भारत नक्षलवादातून मुक्त झाल्याचा दावा तसेच संरक्षण साहित्य निर्यातदार देश म्हणून भारताचा वाढता प्रभाव यांचाही उल्लेख आहे. तरुण पिढीशी संवाद साधण्यासाठी लोकप्रिय संस्कृती (Pop Culture), गेमिंग आणि सोशल मीडिया ट्रेंडचा वापर करण्यावर मोदी भर देत असल्याचे या पोस्टमधून दिसून येते. (Modi GTA Gaming Development Post)
पोस्टला नेटकऱ्यांची पसंती; काही मिनिटांत हजारो लाइक्स
पंतप्रधान मोदी यांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर अवघ्या १० मिनिटांपेक्षा कमी वेळात जवळपास ६० हजार लाइक्स आणि २ हजार कमेंट्स मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. अनेक युजर्सनी पोस्टचे कौतुक केले.
एका युजरने मोदी यांना 'आतापर्यंतचे सर्वात कूल पंतप्रधान' असे म्हटले, तर दुसऱ्या युजरने ही पोस्ट अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया दिली. काही नेटकऱ्यांनी मोदी यांना आपला आवडता इन्फ्लुएन्सर आणि 'ओजी क्रिएटर' असेही संबोधले. गेमिंग स्टाईल, विकासाची आकडेवारी आणि राजकीय संदेश यांचा संगम साधणाऱ्या या पोस्टला सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. (Modi GTA Gaming Development Post)