मुंबई (Mumbai Book Festival Book On Wheels) : मुंबईकरांना पुस्तकांची गोडी लावडण्याच्या उद्देशाने नॅशनल बुक ट्रस्ट, भारत सरकार यांच्या वतीने सज्ज करण्यात आलेल्या ‘बुक ऑन व्हील्स’ या विशेष पुस्तक व्हॅनचे उद्घाटन शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, मुंबई मुख्याध्यापक संघटनेच्या सरचिटणीस वीणा दोनवलकर, मुंबईचे शिक्षणाधिकारी (योजना) संतोष कांबळे, मुलुंड विद्या मंदिरचे मुख्याध्यापक व्यंकट सर आदी मान्यवर उपस्थित होते. (Mumbai Book Festival Book On Wheels)
वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच साहित्यविश्वातील लेखक, कवी, विचारवंत आणि वाचकांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी नॅशनल बुक ट्रस्ट, भारत सरकार, मुंबई विद्यापीठ आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २४ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये ‘मुंबई पुस्तक महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. (Mumbai Book Festival Book On Wheels)
या महोत्सवात विविध भाषांतील पुस्तके, साहित्यिक उपक्रम, लेखकांशी संवाद, परिसंवाद आणि वाचनाशी संबंधित विविध कार्यक्रमांची पर्वणी पुस्तकप्रेमींना अनुभवता येणार आहे. मुंबईकरांनी आपल्या कुटुंबासह, विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या पुस्तक महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी आणि वाचनसंस्कृतीच्या या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन अनिल बोरनारे यांनी केले.
शाळा, महाविद्यालयांपर्यंत पुस्तकांची बस पोहोचणार
मुंबईकरांच्या दारात पुस्तके पोहोचविण्याचा अभिनव उपक्रम म्हणजे ‘बुक ऑन व्हील्स’ होय. या फिरत्या पुस्तक व्हॅनच्या माध्यमातून विविध विषयांवरील पुस्तके वाचकांना उपलब्ध होणार असून, विशेषतः विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि पुस्तकप्रेमींमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मुंबई व ठाणे शहरातील विविध भाग व शाळा महाविद्यालयापर्यंत ही बस पोहचणार आहे. (Mumbai Book Festival Book On Wheels)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....