मुंबई (Maharashtra Water Conservation Mega Plan) : पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी जमिनीत मुरले, तर दुष्काळाच्या संकटावर मात करणे शक्य आहे. याच उद्देशाने महाराष्ट्रात मे २०२७ पर्यंत तब्बल ३४ लाख ८३ हजार ९४० भूजल पुनर्भरण संरचना उभारण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने निश्चित केले आहे. जलसंचय : जनभागीदारी अभियानांतर्गत राज्यभर जलसंधारणाची व्यापक मोहीम राबविण्यात येणार असून, त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस वर्षा निवासस्थानातून सहभागी झाले होते.
राज्यातील जवळपास ९० टक्के भाग दुष्काळाच्या झळा सोसत असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी आगामी काळातील पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले जात असल्याचे स्पष्ट केले. जुन्या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन, तलावांची दुरुस्ती, शेततळी आणि पुनर्भरण खड्ड्यांची निर्मिती यावर भर दिला जाणार आहे. (Maharashtra Water Conservation Mega Plan)
जलयुक्त शिवार योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात १८ हजार गावांची निवड करण्यात आली आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मनरेगा आणि अन्य योजनांच्या निधीचे एकत्रिकरण करून जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. वन विभागाकडून वनबंधारे व वनतळी, तर शासकीय आणि खासगी इमारतींवर छतावरील पावसाचे पाणी साठवण्याच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. ५० किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक लांबीच्या कोरड्या नद्यांचे पुनरुज्जीवनही हाती घेण्यात आले आहे.
जलसंधारणाच्या कामांसाठी केंद्राकडे विशेष आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे. जल जीवन मिशनच्या कामांनाही गती देऊन डिसेंबरपर्यंत निधी खर्चाचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी प्रत्येक नागरिकाने घरात आणि शेतात पाणी अडवण्यासाठी छोटे उपाय केल्यास भूजलपातळी वाढण्यास मोठी मदत होईल, असे सांगितले. जलसंधारण करताना लोकसहभागासोबत शास्त्रीय पद्धती, तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जलसंचय अभियानाची उद्दिष्टे मे २०२७ पर्यंत पूर्ण करण्यासाठी नियमित आढावा घेतला जाणार असून, गावागावांत लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ उभी करण्यावर सरकारचा भर आहे. (Maharashtra Water Conservation Mega Plan)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.