डब्लिन (Shannon Airport Aircraft Sabotage) : आयर्लंडमधील शॅनन विमानतळावर सुरक्षा व्यवस्था भेदून अमेरिकेचे सुमारे ६० मिलियन डॉलर (६०० कोटी रुपयांपेक्षा अधिक) किमतीचे लष्करी विमान पूर्णपणे निकामी केल्याप्रकरणी अमेरिकेने कठोर भूमिका घेतली आहे.
मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन येथे सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रातून मिळालेल्या माहितीनूसार, या प्रकरणी ४८ वर्षीय आयरिश नागरिक डॅथी ओ'कोरेन (डेव्हिड कुरान) याच्यावर अमेरिकी सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दोष सिद्ध झाल्यास त्याला १० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. (Shannon Airport Aircraft Sabotage)
पाच तास चालली विमानाची तोडफोड!
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ११ एप्रिल रोजी घडली. आरोपी ओ'कोरेन याने पहाटे सुमारे ४ वाजून ४० मिनिटांनी विमानतळाची सुरक्षा व्यवस्था चुकवून टॅक्सीवेवर उभ्या असलेल्या अमेरिकन एअर नॅशनल गार्डच्या 'सी-१३० हर्क्युलिस' या लष्करी विमानात प्रवेश केला. हे विमान एका लष्करी मोहिमेसाठी दुसऱ्या देशात रवाना होणार होते. (Shannon Airport Aircraft Sabotage)
आरोपीने विमानात प्रवेश केल्यानंतर आतील लॉकिंग यंत्रणेची तोडफोड केली आणि स्वतःला विमानात बंद करून घेतले. विमानाचे दरवाजे आतून बंद ठेवण्यासाठी त्याने पट्ट्या, ब्रॅकेट आणि स्क्रूचा वापर केला. तसेच दरवाजांच्या ट्रॅकमध्ये इपॉक्सी आणि बॉल बेअरिंग भरून दरवाजे उघडणे किंवा बंद करणे अशक्य केले.
त्यानंतर त्याने विमानातील वायरिंगचे बंडल आणि हायड्रॉलिक पाइप कापले. द्रवरूप ऑक्सिजनची पाइपलाइन खराब केली, एअर डक्ट्सना छिद्रे पाडली आणि कॉकपिटमधील सर्व मीटरची तोडफोड केली. (Shannon Airport Aircraft Sabotage)
एवढ्यावरच न थांबता त्याने विमानाच्या इंधन टाकीत बॉल बेअरिंग आणि अन्य पदार्थ टाकले. तसेच कुऱ्हाडीने विमानाच्या बाह्य भागाचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या नुकसानीमुळे सुमारे ६० मिलियन डॉलर किमतीचे हे विमान पुन्हा उड्डाण करण्यास सक्षम राहिलेले नाही, असे सरकारी वकिलांनी सांगितले.
अनेक महिन्यांपासून सुरू होती तयारी!
अमेरिकी सरकारी वकिलांच्या दाव्यानुसार, ओ'कोरेन याने या घटनेची अनेक महिन्यांपासून नियोजनपूर्वक तयारी केली होती. त्याने इंटरनेटवर सी-१३० विमानाची रचना आणि त्यासंबंधीची माहिती शोधली होती. तसेच विमानतळाच्या परिसरात सुरक्षा यंत्रणेच्या नजरेत न येता प्रवेश करण्याचे मार्गही शोधले होते. (Shannon Airport Aircraft Sabotage)
याशिवाय, त्याने लष्करी विमानांच्या हालचालींसह प्रत्यक्ष विमानांच्या उड्डाणांची माहिती देणाऱ्या एका मोबाइल अॅप्लिकेशनचे सदस्यत्व घेतले होते. त्याने गॅलियम या रसायनाची कॅप्सूलही मागवल्याचा आरोप आहे. हे रसायन विशिष्ट परिस्थितीत अॅल्युमिनियमचे नुकसान करू शकते आणि काही धातूंच्या गुणधर्मांवर परिणाम करू शकते.
आयरिश पोलिसांकडून घटनास्थळीच अटक!
आयरिश पोलिस दल असलेल्या 'एन गार्डा सिओचाना'ने ओ'कोरेन याला घटनास्थळीच अटक केली होती. त्याच्यावर मालमत्तेचे नुकसान करणे आणि परवानगीशिवाय विमानतळ परिसरात प्रवेश करणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. (Shannon Airport Aircraft Sabotage)
आरोपी अद्याप अमेरिकी कोठडीत नाही!
ओ'कोरेन सध्या अमेरिकी तपास यंत्रणांच्या ताब्यात नसल्यांचे वृत्त आहे. नव्या आरोपांप्रकरणी त्याला न्यायालयात कधी हजर केले जाणार, याची तारीखही अद्याप निश्चित झालेली नाही. आरोपपत्रानुसार, त्याला न्यूयॉर्कच्या दक्षिणी जिल्ह्यात आणून अटक केली जाण्याची शक्यता आहे. ऑनलाइन न्यायालयीन नोंदींमध्ये त्याच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलाची माहितीही उपलब्ध नाही.
मॅनहॅटनचे अमेरिकी अटर्नी जेमी मॅकडोनाल्ड यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, अमेरिकी लष्करी मालमत्ता आणि त्याद्वारे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट आणि कठोर संदेश या आरोपपत्रातून देण्यात आला आहे.(Shannon Airport Aircraft Sabotage)
समर्थकांकडून 'शांतता कार्यकर्ता' म्हणून बचाव!
दरम्यान, ओ'कोरेनच्या समर्थकांनी त्याच्या बचावासाठी ऑनलाइन निधी संकलन मोहीम सुरू केली आहे. त्यांनी त्याला 'स्वतंत्र शांतता कार्यकर्ता' असे संबोधले आहे. या मोहिमेच्या आयोजक ट्रेसी रायन यांच्या म्हणण्यानुसार, इराणसोबतच्या युद्धातील अमेरिकेचा सहभाग आणि गाझामध्ये इस्रायलला दिल्या जाणाऱ्या अमेरिकी लष्करी मदतीच्या निषेधार्थ ही कृती करण्यात आली होती, असा समर्थकांचा दावा आहे. (Shannon Airport Aircraft Sabotage)
शॅनन विमानतळावर यापूर्वीही सुरक्षेचा भंग!
पश्चिम आयर्लंडमध्ये असलेले शॅनन विमानतळ हे आंतरराष्ट्रीय प्रवासाचे महत्त्वाचे केंद्र असून, अमेरिकी सैनिक आणि लष्करी उपकरणांच्या वाहतुकीसाठीही त्याचा वापर केला जातो. सप्टेंबरमध्ये आयर्लंड दौऱ्यावर असताना अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानानेही या विमानतळाचा वापर केला होता.
गेल्या काही वर्षांत या विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेत घुसखोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. बीबीसीच्या वृत्तानुसार, मे २०२५ मध्ये तीन जणांनी विमानतळाच्या बाह्य कुंपणाला धडक देत व्हॅन आत घुसवली होती. त्याच महिन्यात अन्य एका घटनेत तीन जणांवर अमेरिकी लष्कराच्या विमानावर स्प्रे-पेंट केल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेमुळे ते विमान काही काळ वापरासाठी अनुपलब्ध झाले होते. त्यामुळे शॅनन विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Shannon Airport Aircraft Sabotage)