ठाणे ,: (Diva International Drug Racket)ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात अमली पदार्थ तस्करीविरोधात मुंब्रा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन नायजेरियन आणि एका सेनेगलच्या नागरिकाला अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल १० कोटी १३ लाख ८ हजार ७०० रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे दिव्यातील अमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून २ किलो १५७ ग्रॅम कोकेन आणि १०४ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हस्तगत करण्यात आले. जप्त केलेल्या अमली पदार्थांची एकूण किंमत १० कोटी १३ लाख ८ हजार ७०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.(Diva International Drug Racket)
अटक केलेल्या आरोपींमध्ये चुकवुएमेका इमानुएल नवाक्नो (४१), युकेरिया चुकवुएमेका ओबियानुजू (४१) आणि ओस्मान बुआरी अली यांचा समावेश आहे. यातील दोघे नायजेरियन नागरिक असून एक जण सेनेगलचा नागरिक आहे.या कारवाईनंतर पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीमागील नेटवर्कचा तपास सुरू केला आहे. या तिघांचे आणखी कोणाशी संबंध आहेत, अमली पदार्थांचा पुरवठा कुठून होत होता आणि या रॅकेटमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.
दिवा परिसरात करण्यात आलेल्या या मोठ्या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.(Diva International Drug Racket)