मुंबई (Rashtriya Sevika Samiti Shaktisadhana Sammelan) : राष्ट्र सेविका समितिच्या ९० वर्षपूर्तीचे औचित्य साधून नवीन पनवेल येथील सीकेटी शाळेत कोकण प्रांताचे दोन दिवसीय "शक्तिसाधना संमेलन" दि. १४ व १५ नोव्हेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शनिवारी सुरु झालेल्या या संमेलनाला संघटनेच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका अलकाताई इनामदार, अखिल भारतीय सहकार्यवाहिका चित्राताई जोशी, माधुरीताई मराठे (संवर्धिनी न्यास), अ. भा. महिला समन्वय सहसंयोजिका भाग्यश्रीताई साठ्ये, अ. भा. सहप्रचार प्रमुख रूपादीदी रावल, कोकण प्रांत कार्यवाहिका पद्मश्रीताई फाटक, कोकण प्रांत सहकार्यवाहिका व संमेलन कार्यवाहिका उमाताई दांडेकर तसेच प्रांत कार्यकारिणी सदस्य यांची उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभले.
अलकाताईंनी आपल्या उद्बोधनात समितिच्या ९ दशकांचा आढावा घेताना, समिति स्थापनेपासून कोकण प्रांतात संघटनेच्या कार्य वृद्धीचा आलेख मांडला. महिलांची, महिलांसाठी राष्ट्रकार्याने प्रेरित ही संघटना सदैव समाजकार्यासाठी तत्पर असते, याचा प्रत्यय वेळोवेळी आला आहे. कोकण प्रांतात अनेक जणींनी स्वयंस्फूर्तीने शाखा सुरु केल्या. त्यामाध्यमातूनच उद्योगमंदिर, शिशुविहार, बालवाटिका असे विविधांगी उपक्रम सुरु झाले. भारताबाहेर विविध २३ देशात हिंदू सेविका समिति नावाने कार्यरत राहताना सेविका आपल्या उद्देशाहुन लक्ष्य हटू देत नाहीत. आणीबाणीच्या काळात समितिकार्य अधोरेखित करताना त्यांनी, सेविकांनी सत्याग्रहात नोंदवलेला सक्रिय सहभाग, विचारपत्रांची केलेली ने- आण तसेच अनेकींनी भोगलेला तुरुंगवास या विषयीची अनेक उदाहरणे दिली. तरुण सेविकांना जागृत केले. ९० वर्षांचे सिंहावलोकन करताना शंभरीची वाटचाल अविरत सुरु राहण्यासाठी त्यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या. त्याच सत्रात स्मृतिसुगंध या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.(Rashtriya Sevika Samiti Shaktisadhana Sammelan)
पुढील सत्रात "नारी तू नारायणी" या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये मोहिनी गर्गे (माजी लष्करी अधिकारी), वर्षा परचुरे (परिवर्तन संस्थेच्या संस्थापिका) आणि अभिधा धुमटकर (प्राध्यापिका) यांनी महिला सबलीकरण या विषयावर आपले विचार मांडले. रुपादीदी रावल यांनी परिसंवादाचा समारोप करताना तिन्ही वक्त्यांचे सार आणि समितिची या विषयावरील भूमिका मांडली.
सायंकाळी प्रात्यक्षिक शाखेत योग, नियुद्ध, मनोरे, दंड, यष्टी, खेळ, योगचाप, घोष अशी १० जिल्ह्यांची शारीरिक सुदृढता दर्शवणारी प्रत्यक्षिके उत्साहात पार पडली. भाग्यश्रीताईंनी नवदशकांच्या साधनेत असणारे नियमित शाखेचे अमूल्य योगदान यावेळी विशद केले. ह्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वीय सहायक सरोज देसाई यांची विशेष उपस्थिती होती.
पहिल्या दिवशीची सांगता "समितिची शौर्यगाथा" या रात्रौकार्यक्रमाने झाली. ह्यात देश-विदेशात समितिच्या सेविकांनी केलेल्या असामान्य कार्याचे, सेवेचे नाट्यरूपात सादरीकरण करण्यात आले. त्यानिमित्ताने ९० वर्षात विविध राज्यात झालेल्या समितिकार्याचा अनुभव सेविकांना घेता आला.(Rashtriya Sevika Samiti Shaktisadhana Sammelan)
दिनांक १५ रोजी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या स्मृतीस वंदन करत एकाच स्थानावर साकारलेल्या एकोणीस शाखांच्या "शाखासंगमा" ने दिवसाची सुरवात झाली. ज्यात तिरंगा प्रारूपात सादर केलेले बर्ची योग प्रात्यक्षिक विशेष होते.
त्यानंतर प्रांत तरुणी विभागातर्फे "युवती ससंद" चे आयोजन केले होते. १० विविध महाविद्यालयातील जवळपास १५० हुन अधिक तरुणींनी यात सहभाग घेतला व सध्य सामाजिक स्थितीवर आपले मत व्यक्त केले. त्याचवेळी गृहिणी व इतर सेविकांसाठी संघटन कौशल्य या विषयावर आधारित एकूण १६ कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या.
९० वे वर्ष घोषाला समर्पित असल्याने यावेळी सघोष संचलनाला वेगळीच ऊर्जा प्राप्त झाली होती. अंबामाता उद्यान, दुर्गामाता मैदान व सुकापूर या तीन ठिकाणाहून प्रत्येकी ३०० जणींच्या च्या संख्येत त्रिधारा संचलने निघाली ज्यात प्रत्येकी २ अशा ६ घोषगणांचा समावेश होता. तीनही संचलने आदई चौकात एकत्र आली. राष्ट्रकार्याला समर्पित, संघटित मातृशक्तिने अश्या पद्धतीने त्रिधारा संचलन अतिशय शिस्तबद्धतेने पार पाडले. एकूण ९३९ सेविकांनी यात सहभाग घेतला होता.(Rashtriya Sevika Samiti Shaktisadhana Sammelan)
समारोपाच्या प्रसंगी अखिल भारतीय सहकार्यवाहिका चित्राताई जोशी यांचे उद्बोधन ऐकण्याची संधी सेविकांसह उपस्थित अन्य श्रोतृवृंदास मिळाली. ९ दशकातील प्रवास उलगडतानाची दोन दिवसात झालेली विचारांची देवाण-घेवाण, सांघिकतेच्या बळावर उत्साहपूर्ण तरीही शिस्तबद्धतेने पार पडलेल्या या नवदशकांच्या उत्सवानिमित्त त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर पुढील दशकाच्या वाटचालीसाठी अनंत आशीर्वाद दिले.
संमेलन स्थानी आमदार प्रशांतजी ठाकूर, पनवेल महानगर पालिकेचे महापौर नितीनजी पाटील तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे मान्यवर गण संमेलनाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. वंदे मातरमच्या गायनाने शक्तिसाधना संमेलन संपन्न झाले.(Rashtriya Sevika Samiti Shaktisadhana Sammelan)