मुंबई पुस्तक महोत्सव २४ नोव्हेंबरपासून; ५०० हून अधिक प्रकाशक, लेखकांचा सहभाग

कलिना संकुलात सहा दिवस साहित्यिक मेजवानी; मुलांसाठी विशेष उपक्रम, प्रवेश विनामूल्य

    17-Nov-2026

Mumbai Book Festival 2026
 
मुंबई, (Mumbai Book Festival 2026): वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि साहित्य, ज्ञान व संस्कृतीची देवाणघेवाण घडवून आणण्यासाठी ‘मुंबई पुस्तक महोत्सव २०२६’चे आयोजन २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी), केंद्रीय शिक्षण मंत्रालय, महाराष्ट्र शासन, मुंबई महापालिका आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने हा महोत्सव होणार आहे.
 
या सहा दिवसीय महोत्सवात ५०० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशक, पुस्तकविक्रेते, लेखक आणि वक्ते सहभागी होणार आहेत. पुस्तक प्रदर्शन आणि विक्रीसोबतच साहित्यिक चर्चा, लेखकांशी संवाद, पुस्तक प्रकाशन, कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध विषयांवरील प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाला दहा लाखांहून अधिक वाचक भेट देतील, असा आयोजकांचा अंदाज आहे.(Mumbai Book Festival 2026)
 
मुलांसाठी विशेष ‘चिल्ड्रन्स कॉर्नर’ हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असेल. यामध्ये कथाकथन, सर्जनशील लेखन कार्यशाळा, प्रश्नमंजुषा आणि संवादात्मक उपक्रमांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना वर्गाबाहेरील आनंददायी शिक्षणाचा अनुभव मिळावा, या उद्देशाने या उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
 
महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून, पूर्वनोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या अधिकृत संकेतस्थळावर महोत्सवाची माहिती आणि नोंदणीचे तपशील उपलब्ध आहेत. मुंबईकरांनी या साहित्यिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.(Mumbai Book Festival 2026)
 
 




संबंधित मजकूर