
मुंबई, (Journalist Harassment Arvind Sawant Supporters) : भाजप सरकारच्या काळात लोकशाही आणि माध्यमांचे स्वातंत्र्य धोक्यात असल्याची वलग्ना करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदार अरविंद सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकार ओम देशमुख यांना दमदाटी केल्याचा निषेधार्ह प्रकार घडला. या घटनेचा सर्व पत्रकार संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. तसेच, अरविंद सावंत यांनी माफी मागावी अशी मागणीही पत्रकार संघटनांनी केली आहे.
मंगळवार, दि. 17 रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रिगल सिनेमा सर्कल परिसरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत त्यांच्याशी संवाद साधत असताना 'झी २४'चे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी राज्यातील दुष्काळ संदर्भात प्रश्न विचारला. मात्र, या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी सावंत यांच्या समर्थकांनी पत्रकाराला दमदाटी केल्याचा आरोप आहे. इतकेच नाहीतर 100 हुन अधिक कार्यकर्ते यावेळी ओम देशमुख आणि इतर पत्रकारांच्या अंगावर धावून जाण्याच्या या प्रकारामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले.(Journalist Harassment Arvind Sawant Supporters)
या घटनेचा महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असून, त्यांना धक्काबुक्की किंवा दमदाटी करणे हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले. अरविंद सावंत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्यावी आणि या प्रकाराबद्दल सर्व पत्रकारांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन बन यांनी केले. पत्रकारांना धक्काबुक्की करणाऱ्या समर्थकांवर पक्षाकडून काय कारवाई केली जाणार, याचे उत्तर ठाकरे पिता-पुत्रांनी द्यावे. तसेच, संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली.
दरम्यान, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदय जाधव यांनीही या घटनेचा निषेध केला. पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा आणि त्यांची उत्तरे मागण्याचा घटनात्मक अधिकार आहे. प्रश्न विचारल्यावर उत्तर देण्याऐवजी पत्रकारांच्या अंगावर धावून जाणे, त्यांना दमदाटी करणे हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी संघटनेच्या वतीने संबंधित पक्षाला पत्र पाठविण्यात येणार असून, पीडित पत्रकार ओम देशमुख यांच्या पाठीशी संघटना ठामपणे उभी असल्याचेही त्यांनी सांगितले.(Journalist Harassment Arvind Sawant Supporters)