प्रसिद्धीच्या हव्यासापोटी खालच्या स्तराचे राजकारण; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; रोहित पवार यांचे वक्तव्य बालिशपणाचे

    17-Nov-2026   

Chandrashekhar Bawankule on Rohit Pawar
 
नागपूर, (Chandrashekhar Bawankule on Rohit Pawar) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमदार रोहित पवार यांनी केलेले आरोप अत्यंत खालच्या पातळीचे असून, ते केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी असे वक्तव्य करत आहेत. रोहित पवार यांनी आरोप करण्यापूर्वी स्वतःची राजकीय उंची लक्षात घ्यावी. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची प्रतिमा मलिन करू नये, अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
 
माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "संबंधित विमान कंपनीच्या विमानातून राज्यातील जवळपास ९० टक्के नेत्यांनी प्रवास केला असेल. स्वतः रोहित पवार यांनीही अनेकदा या कंपनीच्या विमानातून प्रवास केला असून, त्यासंदर्भातील छायाचित्रे उपलब्ध आहेत. एखाद्या विमान कंपनीच्या विमानातून प्रवास केला म्हणजे त्या कंपनीशी संबंधित व्यक्तींशी राजकीय संबंध आहेत, असा अर्थ होत नाही. अशा प्रकारचे आरोप करणे म्हणजे अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण आहे.(Chandrashekhar Bawankule on Rohit Pawar)
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते दिवंगत नेते अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम रोहित पवारांना आवडला नसावा आणि त्या कार्यक्रमाचे महत्त्व कमी करण्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचे आरोप केले असावेत."
 
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अधिकृत स्पष्टीकरण द्यावे
 
"शरद पवार यांनी नेहमीच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपली. त्यांनी कधीही प्रसिद्धीचा असा हव्यास दाखवला नाही. रोहित पवार यांनी शरद पवार यांच्याकडून राजकीय संस्कृती कशी जपावी, हे शिकण्याची गरज आहे. रोहित पवार यांचे वक्तव्य बालिशपणाचे असून, अशा प्रकारच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची राजकीय उंची कमी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही रोहित पवार यांच्या आरोपांबाबत अधिकृत स्पष्टीकरण द्यायला हवे" असेही ते म्हणाले.(Chandrashekhar Bawankule on Rohit Pawar)
 
ते पुढे म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत अजित पवार यांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते. दोघांनीही एकमेकांना भावाप्रमाणे सांभाळले आहे. अजितदादांबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करून रोहित पवार महाराष्ट्राची प्रतिमा खराब करत आहेत. आमचे सुरुवातीपासूनचे म्हणणे आहे की, अजितदादांच्या विमान अपघातामागील संपूर्ण सत्य समोर आले पाहिजे आणि या घटनेचा पूर्णपणे पर्दाफाश झाला पाहिजे. यासाठी देवेंद्रजी स्वतः खूप प्रयत्न करत आहेत. त्यांनी यासाठी काय काय प्रयत्न केले आहेत, याची मला माहिती आहे; मात्र काही गोष्टी ते सार्वजनिकरीत्या सांगू शकत नाहीत."
 
मानहानीची नोटीस पाठवायची का?
 
"अशा आरोपांमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, ज्यांच्याशी आमचे पारिवारिक संबंध आहेत, अशा व्यक्तींवर अशा प्रकारचे आरोप केले जातात, याचे दुःख वाटते. अशा व्यक्तींना मानहानीची नोटीस पाठवायची का? खरे तर रोहित पवार यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करावे. राज्यातील जनतेच्या मनात त्यांची प्रतिमा कमी झाली आहे, हीच त्यांच्यासाठी मोठी मानहानी आहे. रोहित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बाजूला सारले जात असल्याचे दिसत आहे. पक्षात त्यांना कोणी विचारत नसल्यामुळे ते अशा प्रकारची वक्तव्ये करत असावेत. शरद पवार यांच्या गटातून बाहेर पडण्यासाठी जाणीवपूर्वक वेगळे राजकीय वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असावा," अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.(Chandrashekhar Bawankule on Rohit Pawar)
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर