बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि ८० टक्के समाजकारणाचा वारसा शिवसेना ताकदीने पुढे नेत आहे : एकनाथ शिंदे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त यांचे अभिवादन

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले. हिंदुत्व, ८० टक्के समाजकारण आणि शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही दिली.

    17-Nov-2026


Balasaheb Thackeray

मुंबई :
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला हिंदुत्वाचा विचार आणि ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारणाचा मूलमंत्र शिवसेना आजही तितक्याच ताकदीने पुढे नेत आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार महाराष्ट्रात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत असून, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी आहे. बळीराजाला शक्य ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन केल्यानंतर शिंदे बोलत होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेबांची शिकवण होती की, कार्यकर्ता घरात नाही तर दारात शोभून दिसतो. याच विचारानुसार शिवसैनिक राज्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी, दुःख आणि वेदना समजून घेत आहेत. 'जिथे संकट, तिथे शिवसेना आणि जिथे आपत्ती, तिथे शिवसेना' ही बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण प्रत्यक्ष कृतीतून पुढे नेली जात आहे. दुष्काळी भागांमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार आणि मंत्र्यांना दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असा शब्द दिला होता. तो पाळण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, सरकारच्या वतीने तातडीची पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. शिवसेनेच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना दिवाळी मदत देण्यात आली आहे. यापुढेही शेतकऱ्यांच्या पाठीशी मदतीचा हात कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, संपूर्ण मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १२ प्रकारच्या सवलती आणि नुकसानभरपाईचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे अग्रिम मदतीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राजकारण करू नये. ही राजकारण करण्याची वेळ नसून शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन त्यांचे दुःख दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही शिंदे यांनी केले. यावेळी शिवसेनेचे नेते, उपनेते, मंत्री, खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.






संबंधित मजकूर