मुंबई, (Ashish Shelar SIR Questions) : एसआयआरच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राहुल गांधींकडून शंकित वातावरण निर्माण करण्याची रणनीती सुरू असून, त्यातून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे. एसआयआरसंदर्भात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात ४८ प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री आशिष शेलार यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांना सहा सवाल करत, हिंमत असेल तर या सहा प्रश्नांची उत्तरे द्यावी, असे आव्हान दिले.
पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री अॅड. आशिष शेलार म्हणाले की, "या विषयावर न्यायालयात चर्चा होईलच. पण तरीही शंकित वातावरण निर्माण करण्याची रणनिती राहुल गांधी आणि काँग्रेसने सुरु केली असल्याने याविषयावर माध्यमांद्वारे जनतेशी संवाद करणे आवश्यक आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात एसआयआर संदर्भात याचिका दाखल करून काही प्रश्न उपस्थित केले असून एकप्रकारे याविषयी मोहिम राबवण्यात येत आहे. एसआयआरसंदर्भात काँग्रेसने ४८ प्रश्न विचारलेत. यावरून आमचे सहा प्रश्न काँग्रेस आणि राहुल गांधी यांना आहेत."(Ashish Shelar SIR Questions)
'ते' सहा प्रश्न कोणते?
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "तुम्ही जे काही प्रश्न सर्वोच्च न्यायालयात मांडले त्याबद्दल तुम्हाला अधिकार आहे. परंतू, विरोधी पक्षनेते किंवा खासदार म्हणून तुम्ही हे प्रश्न संसदेत चर्चा उपस्थित करून का मांडले नाहीत? तुम्ही न्यायालयात मांडलेले प्रश्न संसदेसमोर का मांडले नाहीत? ज्या सूचना, माहिती आणि प्रश्न तुम्ही उपस्थित केलेत तेच प्रश्न काँग्रेस पक्षाच्या बीएलओंनी किती निवडणूक यंत्रणांकडे उपस्थित केलेत? एसआरआर प्रक्रियेत मतदार, बीएलओ किंवा बीएलए २ यांना काही अधिकार दिले आहेत. एसआयआर प्रक्रियेत चार वेळा सुनावणीचा अधिकार असतो. ज्याला आपल्या नावाबद्दल निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य किंवा अयोग्य आहे असे वाटते त्याला चार वेळा सुनावणीचा अधिकार आहे. काँग्रेसच्या बीएलए २ यांनी किती मतदारांना या अधिकाराची सुविधा दिली? काँग्रेस सरकारच्या काळात १२ वेळा एसआयआर झाला, त्यावेळी काँग्रेसने असे प्रश्न आणि सूचना तुम्ही मांडल्यात का?"(Ashish Shelar SIR Questions)
काँग्रेस सरकारने किती वेळा कायद्यात बदल केला?
"निवडणूक प्रक्रियेच्या सगळ्या विषयांमध्ये भारतीय संविधान आणि लोकप्रतिनिधी अधिनियम यात विविध कलमे आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात या कायद्यात किती वेळा बदल केला?काँग्रेस सरकारच्या काळात मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची नेमणूक कशी व्हायची?" असा सवाल मंत्री आशिष शेलार यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांना केला. तसेच हे सहा प्रश्न काँग्रेसच्या वातावरण दुषित करण्याच्या प्रयत्नांची पोलखोल करणारे असून हिंमत असेल तर काँग्रेसने आणि राहुल गांधींनी या सहा प्रश्नांची उत्तरे द्यावी, असे आव्हानही त्यांना दिले. ३ कोटी बेपत्ता, अवैध, अभारतीय मतदारांची नावे वाचवण्यासाठी काँग्रेस आणि राहुल गांधी आकांत तांडव करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.(Ashish Shelar SIR Questions)
रोहित पवारांचे विधान म्हणजे राजकीय नीचपणा
"रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेतली. यात काय बोलले गेले आणि कोण बोलले यावर वेगवेगळा विचार केला पाहिजे. रोहित पवार यांचे विधान हा राजकीय नीचपणा आहे. ज्या पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली त्याबद्दल त्यांच्याकडे काही थेट, सबळ किंवा परिस्थितीजन्य पुरावा आहे का? त्यांनी जे म्हटले त्यात काहीही स्पष्टता नाही. तरीही एखादे कथानक निर्माण करून वातावरण शंकित करण्याला राजकीय नीचपणा म्हणता येईल. रोहित पवारांना या विधानाची आवश्यकता का पडली? वैफल्यातून निर्माण झालेली ही त्यांची चीड असून त्यातूनच त्यांनी हे विधान केले," असेही मंत्री आशिष शेलार म्हणाले.
उबाठा गटाने पत्रकारांची माफी मागावी
उबाठा गटाचे खा. अरविंद सावंत यांच्या समर्थकांनी पत्रकारांना केलेल्या धक्काबुक्कीवर बोलताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "पत्रकार आपले काम करत असतात. ते जनतेचे प्रश्न मांडत असतात. कधीकधी त्यांचे प्रश्न कुणाला आवडतात कुणाला आवडत नाही. पण राजकारणात किंवा सामाजिक जीवनात संयम हा गुण आवश्यक आहे. मात्र, संयम हा जणू दुर्गुण आहे, असे उबाठा गटाच्या लोकांचे वागणे आहे. याआधीही उद्धव ठाकरे सरकारच्या काळात घरात घुसून संपादकांना घरातून खेचून बाहेर काढले. समाजमाध्यमांवर कुणी आपले मत मांडल्यास त्याला सार्वजनिकरित्या बाहेर आणून वडाळ्याच्या चौकात त्याचे मुंडन करून शिक्षा देण्याची कारवाई त्यांनी केली. पत्रकारांसोबत वेळोवेळी दूजाभाव करणे, त्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करणे अयोग्य आहे. पत्रकारांच्या संरक्षणासाठी पोलिस आणि सरकार सक्षमपणे उभे राहिल. पण यासंदर्भात उबाठा गटाने पत्रकारांची जाहीर माफी मागितली पाहिजे."(Ashish Shelar SIR Questions)
संजय राऊतांना महापालिकेची माहिती किती?
संजय राऊत यांनी केलेल्या एसआरए प्रकल्पांमध्ये काही बिल्डर लॉबीच्या बेकायदेशीर कामांना मंजूरी देऊन कोट्यवधींचा महसुल बुडवला जात असल्याच्या आरोपावर बोलताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "संजय राऊत यांना महापालिकेत पडण्याची काय गरज? त्यांना महापालिकेची किती माहिती आहे? विकास, नियंत्रण आणि नियमावलीशी त्यांचा काही संबंध आहे का? राऊतांनी कधी मुंबई शहर व्यवस्थापन आणि विकासासंदर्भात भूमिका मांडली का? कुणीतरी माहिती दिली आणि आपण बोलायचे यापेक्षा यात दुसरे काहीही नाही. हा विषय मुख्यमंत्र्यांकडे असल्यास ते निर्णय करतील."(Ashish Shelar SIR Questions)